40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयबहनों और भाईयों...

बहनों और भाईयों…

मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी ‘जी हां बहनों और भाईयों, मै हूं आपका दोस्त अमीन सयानी’ अशा मखमली, मधाळ पण तितक्याच भारदस्त स्वरात संगीत रसिकांच्या मनावर गारूड करणारा आवाज, जादुई शब्द कायमचे लुप्त झाले. ‘बिनाका गीतमाला’तील गाण्यांपेक्षा कित्येक पटीने लोकप्रिय ठरलेला हा स्वर आता कायमचा शांत झाला. देशाने रेडिओ युगाच्या सुवर्णकाळाचा एक शिल्पकार, आवाजाचा जादूगार गमावला. बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी भारतीय लोकशाहीच्या मजबुतीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या अनेक खटल्यांमध्ये योगदान देणारे विख्यात कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील फली सॅम नरिमन काळाच्या पडद्याआड गेले. अमीन सयानी ९१ तर फली नरिमन ९५ वर्षांचे होते. निसर्गनियमानुसार त्यांचे जाणे योग्य असले तरी त्यांच्या जाण्याने त्या-त्या क्षेत्राची झालेली हानी कधीही भरून न निघणारी अशीच आहे. तर्कशुद्ध बौद्धिक युक्तिवाद आणि नैतिकतेची सुरेख सांगड घालत ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांनी भारतीय न्यायव्यवस्थेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली यात शंका नाही. ज्या खटल्यांमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली, त्यात नरिमन यांचे योगदान विधी क्षेत्राच्या इतिहासात अजरामर ठरणारे आहे.

भारतीय राज्यघटनेची मूलभूत चौकट स्पष्ट करणा-या केशवानंद भारती खटल्यात नरिमन यांचे उल्लेखनीय योगदान होते. ते नागरिकांचे स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेचे खंदे समर्थक होते. त्यांनी वेळोवेळी विविध मुद्यांवर सरकारविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवला होता. १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नरिमन यांची ‘अतिरिक्त महान्याय अभिकर्ता’ पदावर नियुक्ती केली होती. मात्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली. त्याच्या दुस-याच दिवशी नरिमन यांनी आणीबाणीच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. १९८४ च्या भोपाळ विषारी वायुदुर्घटनेनंतर नरिमन यांनी ‘युनियन कार्बाईड कॉर्पोरेशन’ची बाजू मांडली होती. नंतर त्यांनी ती आपली चूक होती असे प्रामाणिकपणे कबूल केले होते. असा हा असामान्य, बुद्धिमान विधिज्ञ नाहिसा झाल्याने विधी क्षेत्राची पर्यायाने देशाची अपरिमित हानी झाली आहे. सात दशकांपूर्वी अमीन सयानी नामक व्यक्तीने आवाजाच्या दुनियेत, भारतीय प्रसारण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे काम सुरू केले. २१ डिसेंबर १९३२ रोजी अमीन सयानी यांचा मुंबईत एका गुजराती कुटुंबात जन्म झाला.

त्यांचे शालेय शिक्षण सिंधिया स्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्समध्ये झाले. विधिज्ञ क्षेत्रातील पदवी घेऊन वकिली करण्याची त्यांची इच्छा होती परंतु विधिलिखित वेगळेच होते. त्यांचे मोठे बंधू हमीद रेडिओवर इंग्रजी उद्घोषक म्हणून काम करत होते. त्यांनी अमीन यांच्यातील गुण ओळखून त्यांना ११व्या वर्षीच ऑल इंडिया रेडिओवर कामाला लावले. दशकभर ते इंग्रजी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करीत असत, पण या अनुभवाचा फायदा त्यांना पुढील काळात झाला. साध्या सोप्या भाषेत निवेदन करण्याची हातोटी आणि मुख्य म्हणजे आवाज या गुणविशेषाने त्यांची व्यावसायिक कारकीर्द यशोशिखरावर गेली. उमेदीच्या काळात त्यांनी टाटा ऑईल मिलच्या मार्केटिंग विभागातही काम केले. परंतु या प्रवासात त्यांना खरी ओळख मिळाली ती निवेदक म्हणून. १९५१ ते २००० पर्यंतचा काळ त्यांच्या खुमासदार निवेदनाने, खर्जातील आवाजाने भारावून टाकणारा राहिला. साठच्या दशकातील पिढीच्या हृदयात ‘बहनों और भाईयों’ हा आवाज आजही घर करून आहे. १९५२ मध्ये रेडिओ सिलोनवर ‘बिनाका गीतमाला’ सुरू झाली. रामायण-महाभारत मालिका सुरू झाली की रस्ते ओस पडलेले आपण पाहिले आहेत.

‘बिनाका गीतमाला’ कालातही तीच स्थिती होती. रेडिओ सिलोनच्या प्रभावी ट्रान्समीटरइतकाच प्रभावी, आकर्षक विशीतला युवा निवेदक ‘बिनाका गीतमाला’तून एक इतिहास घडवत होता. अमीन सयानी प्रभावी, परिणामकारक संवाद शैलीतून भारतातल्या तरुणाईला साद घालत होते. त्यांच्याशी साध्या, सोप्या हिंदीतून बोलत होते. कोणताही भारतीय एकात्मता साधण्याचा तो राष्ट्रीय सरकारी कार्यक्रम नव्हता की हिंदी भाषेची प्रसारसभा नव्हती. आपले उत्पादन विकणा-या कंपनीसाठी तो एक व्यावसायिक कार्यक्रम होता. पण त्यात अमीन सयानी यांनी असे काही प्राण ओतले की त्यातून एक पिढी हिंदी बोलू लागली. मोठे बंधू हमीद यांनी बिनचूक, सत्य, स्पष्ट, सरळ, सभ्य आणि आकर्षक शैलीत निवेदन करण्याचा सल्ला दिला होता. अमीन सयानींनी तो पाळला आणि त्याला सुहृदयतेची, प्रेमाची जोड देत निवेदन एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. सुरुवातीचा अर्ध्या तासाचा कार्यक्रम एक तासाचा झाला. प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांनी गाण्याचा पसंतीक्रम रसिकांवर सोपवला. टॉपच्या गाण्याला ‘सरताज’, ‘अगली पायदान’ असे शब्द त्यांनी लोकप्रिय केले.

अमीन सयानी यांचे ‘सॅरिडॉन के साथी’, ‘एस. कुमार्स का फिल्मी मुकदमा’, ‘मराठा दरबार की महकती बातें’, ‘जोहर के जवाब’, आदी रेडिओ कार्यक्रमही खूप गाजले. या कामात त्यांना मदत करणा-या काश्मिरी युवती रमा मट्टूच्या प्रेमात ते पडले, २८व्या वर्षी विवाहबद्ध झाले. रमाबरोबरचे सहजीवन सुरेल, समाधानी ठरले. आपल्या कार्यक्रमात त्यांनी अनेक अभिनेते, अभिनेत्री, गीतकार, संगीतकार यांच्या मुलाखती घेतल्या. नर्मविनोदाची पखरण, स्पष्टता, खेळकरपणा यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या मुलाखती श्रवणीय ठरल्या. तबस्सुमची ओळख त्यांनी ‘मेरी छोटी और मोटी बहन’ अशी करून दिली होती. त्यांचं आवडतं गीत होतं ‘मन रे, तू काहे ना धीर धरे’, आज भाषा बिघडली, परस्परातला भाईचारा, गोडवा हरवला म्हणून ते व्यथित होत तेव्हा त्यांना रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेची आठवण होत असे.. व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर…. मन जहाँ न डरे, सर जहाँ न झुके ऐसा देश हो हमारा! स्वामी विवेकानंदांच्या पावलावर पाऊल ठेवत म्हणत… बहनों और भाईयों!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR