40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रहिंगोलीतून हेमंत पाटील मैदानात

हिंगोलीतून हेमंत पाटील मैदानात

शिंदे गटाचे ८ उमेदवार जाहीर, गोडसे, गवळींना डच्चू?
पाटीलविरुद्ध पाटील लढत रंगणार
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. पहिल्या उमदेवार यादीत ८ जणांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण-मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांच्यासह ८ ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यामध्ये ठाणे, वाशिम-यवतमाळ आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्यमान खासदार भावना गवळी आणि हेमंत गोडसे हे अद्याप गॅसवरच आहेत. दरम्यान, हिंगोलीत हेमंत पाटील यांची ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी लढत रंगणार आहे.

याआधी भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवार यांनी आपले उमदेवार जाहीर केले. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. शिंदे गटाच्या यादीत नाशिक, यवतमाळ-वाशिम आणि ठाण्याची उमेदवारी जाहीर केली नाही. नाशिकच्या हेमंत गोडसेंच्या नावाला भाजपचा विरोध आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीने त्या जागेवर दावा केला आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. ही जागा आपल्यालाच मिळावी, म्हणून भाजप आग्रही आहे तर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिंदेही ती जागा सोडण्यास तयार नाहीत.

कल्याण, वाशिमचा
उमेदवार घोषित नाही
कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील. पण त्यांचे नाव पहिल्या यादीत नाही. तसेच यवतमाळ-वाशिमच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. वाशिमच्या पाच वेळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे. संजय राठोड यांना उमेदवारी द्यावी, असा भाजपचा आग्रह आहे. यासोबतच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याही नावाचा उल्लेख नाही.

रामटेकमधून तुमानेंना डच्चू
रामटेकचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार तुमाने यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे तुमाने यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. दरम्यान, त्यांच्या जागी आता कॉंग्रेसमधून शिंदे गटात दाखल झालेले आमदार राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे रामटेकमध्ये आता राजू पारवे विरुद्ध कॉंग्रेसचे श्याम बर्वे यांच्यात लढत रंगणार आहे. रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाल्याने श्याम बर्वे मैदानात असतील.

यांना मिळाली उमेदवारी
मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे
कोल्हापूर : संजय मंडलिक
शिर्डी : सदाशिव लोखंडे
बुलढाणा : प्रतापराव जाधव
हिंगोली : हेमंत पाटील
मावळ : श्रीरंग बारणे
रामटेक : राजू पारवे
हातकणंगले : धैर्यशील माने

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR