Homeअंतरराष्ट्रीयकामाचा दबाव, नोकरी जाण्याच्या भीतीने दरवर्षी ८ लाख मृत्यू

कामाचा दबाव, नोकरी जाण्याच्या भीतीने दरवर्षी ८ लाख मृत्यू

धक्कादायक... ‘टॉक्सिक वर्क कल्चर’चा परिणाम भारतात दरवर्षी २ लाखाहून अधिक मृत्यू

जीनिव्हा/नवी दिल्ली : राहणीमान सुधारणे, कुटुंबाला आधार देणे आणि आत्मनिर्भरता जपणे यासाठी नोकरी पर्याय असते. याच पर्यायासाठी बहुतांश लोक अनेक शहरांतून कन्फर्ट सोडून दुस-या शहरांकडे वळतात. परंतु तीच नोकरी, टॉक्सिक वर्क कल्चर जेव्हा जीवघेणी ठरते तेव्हा चिंता वाढते. जीनिव्हा जागतिक कामगार संघटनेकडून समोर आलेले नवीन आकडे धक्कादायक आहेत. दरवर्षी ८ लाख ४० हजाराहून अधिक लोक टॉक्सिक वर्क कल्चरमुळे मृत्यूमुखी पडत असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

लोकांना कामाशी निगडित चिंता, अधिक वेळ कामाला वेळ देणे, नोकरी जाण्याची चिंता सतावणे या सर्व गोष्टींमुळे साइकोसोशल रिस्क जन्माला येते. त्यामुळेच लोक हार्ट आणि ब्रेनशी निगडित समस्यांचा सामना करत आहेत. काही प्रकरणात मानसिक दबावामुळे कर्मचारी टोकाचे पाऊल उचलत आहेत. या आजारामुळे अकाली मृत्यू पावणा-या लोकांची संख्या समोर येते, ज्यामुळे दरवर्षी जागतिक जीडीपीच्या १.३७ टक्के इतके अंदाजित आर्थिक नुकसान होते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हा रिपोर्ट कामाच्या ठिकाणी असलेल्या मानसिक वातावरणाचे परीक्षण करतो. सर्वात पहिले कर्मचा-यांना त्यांची उद्दिष्टये साध्य करण्यास मदत व्हावी यासाठी कामाचे वातावरण कसे तयार केले जाते आणि त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते हे पाहिले जाते.

दुसरा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यालयाचे वातावरण, सहकारी, वरिष्ठ आणि व्यवस्थापनासोबतचे संबंध आणि संवाद, कारण हे घटक देखील मानसिक आजारास कारणीभूत ठरतात. तिसरं म्हणजे कार्यालयाची धोरणे आणि नियम, जसे की कामासाठी, घरून काम करण्यासाठी आणि वैयक्तिक कामासाठी वेळेवर मिळणारी रजा, आणि आरोग्याशी संबंधित लाभ यांच्याशी निगडित आहेत. दरम्यान, कामाच्या ठिकाणी निर्माण होणारे वातावरण लोकांमध्ये हृदयविकार, स्ट्रोक आणि मानसिक आजारांचा धोका वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असे वैज्ञानिक अभ्यासांमधून मिळालेल्या डेटातून स्पष्ट दिसते. जागतिक आरोग्य संघटना आणि ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अभ्यासाकडील जागतिक मृत्यूदर आणि आरोग्यविषयक डेटाला हे धोके लागू करून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने हा डेटा प्रसिद्ध केला आहे.

भारतात ६० टक्के अधिकांना थकवा
मागच्या वर्षी ३० देशांच्या मॅकेन्झी सर्व्हेत असे आढळले की भारतातील ६०% लोक कामाच्या ओझ्यामुळे खूप थकलेले आणि चिंताग्रस्त असतात. २०१९ मधील एका रिपोर्टनुसार, मुंबई हे जगातील सर्वात कामसू शहर आहे. या बाबतीत राजधानी दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. या यादीत हनोई दुस-या आणि मेक्सिको सिटी तिस-या स्थानावर आहेत. २०१८ मधील एका सर्व्हेनुसार, भारतीयांना जगातील इतर सर्व देशांच्या तुलनेत खूप कमी सुट्या मिळाल्या.

आठवड्यात ५५ तासांपेक्षा
जास्त कामामुळे मृत्यूचा धोका
जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांनी २०२१ मध्ये जास्त काम केल्याने होणा-या परिणामांवर एक अभ्यास केला होता. त्यानुसार आठवड्यात ३५ ते ४० तास काम करणा-यांच्या तुलनेत ५५ तास किंवा त्याहून अधिक तास काम केल्याने मृत्युचा धोका अनेकपटींनी वाढू शकतो. तसेच जास्त काम केल्याने हेल्थ कॉम्प्लिकेशन्समुळे मरणा-यांची सर्वाधिक संख्या भारतात होती, असेही अभ्यासातून उघड झाले. हा फक्त लोकसंख्येचा मुद्दा नाही, कारण चीनमध्ये जास्त लोकसंख्या असूनही भारताच्या तुलनेत परिस्थिती चांगली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR