Homeअंतरराष्ट्रीयजगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट

जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट

दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प ‘आयईए’ प्रमुखांचा इशारा

न्यूयॉर्क : इराण युद्धाच्या परिणामांमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प झाला असूम वाढत्या किमतींमुळे इंधनाच्या मागणीवर मोठा ताण येईल आणि यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो, असा इशारा आयईएचे प्रमुख फातिह बिरोल यांनी दिला आहे.

अमेरिका आणि इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास नकार दिल्याने गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी झेप घेतली आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अमेरिकन नौदलाची नाकेबंदी सुरू आहे, तोपर्यंत हा जलमार्ग बंदच राहील. यामुळे ब्रेंट क्रूड ३.६२% वाढीसह १०५.६३ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले. तर डब्ल्यूटीआय क्रूड ४.०६% वाढीसह ९६.७३ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले. दरम्यान भारतात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राजकीय सभा सुरू आहेत, मतदान होत आहे आणि राजकीय वक्तव्यबाजी वाढत आहे. पण या राजकीय गदारोळात सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

ही चिंता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींशी संबंधित आहे. गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक तेल बाजार तणावाखाली आला आहे. क्रूडच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून पुरवठ्याच्या प्रमुख मार्गांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि ऊर्जेची आयात करणा-या राष्ट्रांना आयातीसाठी आधीच अधिक पैसे मोजावे लागत आहेत. यादरम्यान, सरकारे आणि ग्राहक आयातीचा वाढीव खर्च सोसत असल्याने अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा भडका उडाला आहे.

होर्मुझमधून इराणची पहिली ‘टोल’ वसुली
धक्कादायक बाब म्हणजे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणा-या जहाजांवर टोल आकारण्यास सुरुवात केली आहे. इराणच्या संसदेचे उपाध्यक्ष हाजी बाबाई यांनी माहिती दिली की, या टोलमधून मिळालेला पहिला महसूल इराणच्या सेंट्रल बँकेत जमा करण्यात आला आहे.

होर्मुझमधील सुरुंग काढण्यास ६ महिने लागणार?
पेंटागनच्या अंदाजानुसार, इराणने होर्मुझमध्ये पेरलेल्या समुद्री सुरुंग साफ करण्यासाठी किमान ६ महिने लागू शकतात. अमेरिकन खासदारांच्या गुप्त बैठकीत ही माहिती देण्यात आली असून, इराणविरुद्धच्या युद्धाची नेमकी रणनीती आणि उद्दिष्टांबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

युरोपवरही युद्धाची सावली
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी चेतावणी दिली आहे की, या युद्धाचा परिणाम केवळ मध्य पूर्वेपुरता मर्यादित नसून तो युरोपपर्यंत पोहोचला आहे. युरोप आधीच महागाई आणि ऊर्जा टंचाईशी झुंजत असताना, या संघर्षामुळे तेथील परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR