मुंबई/अकोला : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. राज्यात कृषी कर्जाच्या आकडेवारीची जुळवाजुळव केली जात असून त्यासाठी कृषी कर्जाची माहिती पोर्टलवर मागवण्यात आली.
यासाठी थकबाकीदार शेतक-यांचे केवायसी आवश्यक आहे. मात्र, असंख्य शेतक-यांचे केवायसी प्रलंबित असून त्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे संबंधितांना वारंवार सूचित केले जात आहे. अन्यथा केवायसी प्रलंबित थकबाकीदार शेतक-यांवर अपात्रतेची कु-हाड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात शेतक-यांवर नैसर्गिकसह विविध संकटे कोसळल्याने ते आर्थिकदृष्टया अडचणीत आहेत. कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये देखील वाढ होताना दिसून येते. त्यामुळे कृषी कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून शेतक-यांना कर्जमाफी दिली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आता प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. शेती क्षेत्रात आणि शेतक-यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतक-यांची थकित कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे.
पोर्टलवर युध्दपातळीवर काम सुरू
आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी शेती कर्जाची माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू केली आहे. ही माहिती शासनाने पोर्टलवर भरण्यासाठी सर्व थकबाकीदार शेतक-यांचे केवायसी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यामध्ये शेतक-यांचे आधार क्रमांक आवश्यक आहेत. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या व बँकेकडे बहुतांश शेतक-यांचे आधार कार्ड उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांची केवायसी प्रलंबित आहे.
मयतांच्या वारसांनी आधार कार्ड बँकेत जमा करावे
बँकेमार्फत घेतलेल्या कर्जाची शेतक-यांनी केवायसी करणे आवश्यक आहे. शेतकरी मयत झाले असतील, तर त्यांच्या वारसांनी त्यांचे आधार कार्ड संबंधित बँकेकडे जमा करणे गरजेचे आहे. केवायसी न केल्यास संबंधित शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
थकबाकीदार शेतक-यांचे केवायसी प्रलंबित
अनेक जिल्ह्यांत आधार नसलेल्या एकूण खात्यांची संख्या हजारो आहे. त्या सर्व थकबाकीदार शेतक-यांनी तत्काळ आपले केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

