चेन्नई: तमिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक विजय मिळवून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले अभिनेते थलपती विजय सध्या एका मोठ्या वादात सापडले आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात विजय यांनी आपल्या बालपणातील संघर्षाचा आणि गरिबीचा उल्लेख केला होता. मात्र, त्यांच्या या दाव्यावर त्यांचेच जुने वर्गमित्र आणि प्रसिद्ध लेखक मनू जोसेफ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे.
In his first speech as Tamil Nadu chief minister, Vijay said that he grew up in poverty, and that he even knows what hunger is. It's bullshit because he was my classmate in the third standard in Loyola School.
His father was a filmmaker who set up his son for a career in films.…— Manu Joseph (@manujosephsan) May 11, 2026
विजय यांनी आपल्या पहिल्या भाषणात म्हटले होते की, “माझे बालपण प्रचंड गरिबीत गेले असून मला भुकेच्या वेदनांची चांगलीच जाणीव आहे.” त्यांच्या या भावूक विधानाने संपूर्ण देश भारावून गेला होता. मात्र, स्तंभलेखक मनू जोसेफ यांनी ट्विटरवर (X) एक पोस्ट शेअर करत विजय यांच्या या विधानाला “पूर्णपणे निरर्थक” म्हटले आहे.
मनू जोसेफ यांनी आपल्या पोस्टमध्ये काही खळबळजनक मुद्दे मांडले आहेत. जोसेफ यांच्या म्हणण्यानुसार, ते आणि विजय चेन्नईतील प्रसिद्ध ‘लोयोला स्कूल’मध्ये तिसरीच्या वर्गात एकत्र होते. विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे प्रस्थापित चित्रपट निर्माते होते. त्यांनीच विजय यांना सिनेसृष्टीत लाँच केले. जोसेफ यांच्या मते, चित्रपट व्यवसायातील चढ-उतार म्हणजे तमिळनाडूतील ‘व्यापक गरिबी’ नव्हे. “श्रीमंत घरातील मुलं ‘हातात तात्पुरता पैसा नसणं’ आणि ‘खऱ्या गरिबीत जगणं’ या दोन गोष्टींची गल्लत करतात,” असा टोलाही त्यांनी लगावला.
जोसेफ यांच्या या दाव्यानंतर इंटरनेटवर वादाला तोंड फुटले आहे. एका युजरने जोसेफ यांना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. काही युजर्सनी विजय यांच्यावर टीका करताना म्हटले की, “ते शाळेत चक्क ‘टाटा सफारी’ मधून येत असत, मग गरिबी कुठे होती?” दुसरीकडे, काही समर्थकांनी जोसेफ यांच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित केला आहे. एका युजरने विचारले की, “चेन्नईत ‘लोयोला स्कूल’मध्ये तिसरी इयत्ता अस्तित्वात नाही, मग तुम्ही नक्की कोणत्या शाळेबद्दल बोलत आहात?”
आपल्या पहिल्याच भाषणावरून इतका मोठा वाद निर्माण होऊनही मुख्यमंत्री थलपती विजय किंवा त्यांच्या पक्षाकडून (TVK) अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ‘थलपती सरकार’ स्थापन झाल्याच्या आनंदात असलेल्या समर्थकांसाठी हा वाद काहीसा धक्कादायक ठरला आहे.

