नाशिक : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET (नीट) परीक्षा यंदा पेपरफुटीच्या वादंगामुळे चर्चेत आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत पोहोचले असून, नाशिक पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. या पेपरफुटीमध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय संशयिताने (जो BAMS चा विद्यार्थी असल्याचे समजते) नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका १० लाख रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर अधिक नफा मिळवण्यासाठी त्याने हीच प्रश्नपत्रिका हरियाणातील एका डॉक्टरला १५ लाख रुपयांना विकली. या व्यवहारातून त्याने अवघ्या काही वेळात ५ लाखांची कमाई केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
तपासात असे समोर आले आहे की, नीट पेपरची पहिली कॉपी नाशिकमध्ये समोर आली. नाशिकहून हा पेपर हरियाणातील गुरुग्राममध्ये पोहोचला. हरियाणात पोहोचल्यानंतर या पेपरचे १० संच तयार करण्यात आले आणि तिथून ते राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीरपर्यंत पसरले. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही प्रश्नपत्रिका वणव्यासारखी पसरली.
अटकेपासून वाचण्यासाठी संशयित आरोपीने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने आपली हेअरस्टाईल बदलली होती आणि टक्कलही केले होते. मात्र, नाशिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे सापळा रचून त्याला इंदिरानगर भागातून शिताफीने ताब्यात घेतले. राजस्थान सीबीआयने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
नीट पेपरफुटीचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने हा तपास सीबीआय (CBI) कडे सोपवला आहे. या प्रकरणात जयपूरमधून अटक करण्यात आलेला ‘मनीष’ हा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमधून अटक केलेल्या या तरुणाची आता सखोल चौकशी केली जाणार असून, यात आणखी काही ‘मोठे मासे’ गळाला लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या गोंधळामुळे ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली असून, पुढील परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

