ठाणे : प्रतिनिधी
गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुर्दैवाने दोन व्यक्तींचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काळू शंकर गाडेकर (वय ५३) आणि सागर शिंदे (वय ४३ वर्षे) अशी या आगीत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
गुरुवारी पहाटे ३:४५ वाजता ठाण्यातील नौपाडा परिरातील गोखले रोडवरील गावदेवी भाजीपाला मार्केटला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या वॉटर टँकर्स, दोन रेस्क्यू वाहनांसह आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झाल्या. तसेच पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी गेलेला एक अग्निशमन जवान आणि रात्रपाळी करणारे महानगरपालिकेचे तिथले सुरक्षारक्षक या दोघांचा आगीमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघांना कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.
या घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू
काळू शंकर गाडेकर आणि सागर शिंदे या दोघांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अग्निशमन विभागातील तीन कर्मचारीही जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सुजित पष्टे (४५), स्थानक अधिकारी तांडेल आणि समीर जाधव (४०), यांचा समावेश आहे. दोघांवरही छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
















