सुरत : गुजरात मधील सुरत जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सुरत जिल्ह्यातील बार्डोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातानंतर एका बसने पेट घेतल्याने ७ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार, हा अपघात बारडोली तालुक्यातील उवा आणि मानेकपोर गावाच्या दरम्यान झाला. महाराष्ट्र डेपोची एक एसटी बस (क्रमांक MH-18-BZ-1258) धुळ्याहून नवापूर मार्गे सुरतच्या दिशेने जात होती, तर दुसरी एसटी बस (क्रमांक MH-20-BL-3390) समोरून येत होती. या दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, एक बस महामार्गावरच पलटी झाली. बस उलटल्यानंतर काही क्षणातच तिचा भीषण स्फोट झाला आणि बसने पेट घेतला. आग इतकी भीषण आणि वेगाने पसरली की, बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. पहात रहा एकमत डिजिटल
घटनेची माहिती मिळताच बार्डोली अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसला लागलेली आग आटोक्यात आणली. पोलीस प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू करत गंभीर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. या अपघातात सात प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असून, सहा मृतदेह ताब्यात घेऊन ते बार्डोली येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
या भीषण अपघातामुळे धुळे-सुरत हायवेवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस सध्या हायवेवरील अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत. या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात असून प्रवाशांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. प्रशासनाकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
या अपघातामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेवर सरकारकडून काही मदतीची घोषणा होईल का किंवा मृतांच्या वारसांना काय नुकसान भरपाई मिळेल, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
















