नवी दिल्ली : यूपीमधील तीन मंदिर-मशीद वादांबाबत हिंदू आणि मुस्लिम पक्षांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळला आहे. हे तीन वाद वाराणसीतील ज्ञानवापी मशीद, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह आणि संभलमधील शाही जामा मशिदीशी संबंधित आहेत.
वाराणसीतील ज्ञानवापी मशीद वाद, मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह जमीन वाद आणि उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशीद वाद या प्रकरणांमधील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावित सहमतीने वाद निवारण प्रक्रियेत सहभागी होण्यास नकार दिला असून त्याऐवजी या विवादास्पद खटल्यांवर त्यांच्या कायदेशीर गुणवत्तेनुसार निर्णय व्हावा, असा पर्याय निवडला आहे. एचटीला असे समजले आहे की, सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने अलीकडेच तीन मंदिर-मस्जिद वादांमधील सर्व विरोधी पक्षांना पत्र लिहून, सर्वोच्च न्यायालयाच्या सुप्रीम कोर्ट अॅक्शन फॉर मेडिएटेड अॅडज्युडिकेशन अँड डिस्प्युट्स हार्मोनायझेशन अक्रॉस नेशन (समाधान समारोह) २०२६ या देशव्यापी मध्यस्थी उपक्रमांतर्गत सामंजस्यपूर्ण तोडगा काढण्यासाठी आमंत्रित केले आहे, ज्याची सांगता २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान होणा-या विशेष लोक अदालतीने होईल.
तथापि, हिंदू पक्षकारांचे प्रतिनिधित्व करणा-या पक्षांनी आणि तीन मशिदींचे व्यवस्थापन करणा-या संस्थांनी सर्वोच्च न्यायालयाला, तसेच संबंधित राज्य आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांना कळवले आहे की, ते मध्यस्थी प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक नाहीत. तिन्ही विवादांशी संबंधित वकील आणि पक्षकारांनी एचटीला सांगितले की, प्रार्थनास्थळांवरील परस्परविरोधी दावे, मालकी हक्काचे प्रश्न, घटनात्मक मुद्दे आणि अत्यंत सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींचा समावेश असलेले खटले लोक अदालत किंवा मध्यस्थीद्वारे सोडवण्याऐवजी न्यायालयांनी निकाली काढावेत, असे त्यांचे मत आहे.
















