गयाजी : बिहारमधील गयाजी येथे एका ई-रिक्षा चालकाच्या बँक खात्यात अचानक ७.६० अब्ज रुपयांचा बॅलन्स दिसल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. पेन्शनची रक्कम काढण्यासाठी गेलेल्या या रिक्षा चालकाला जेव्हा मोबाईलवर बँकेचा मेसेज आला, तेव्हा तो स्वत:ही खूप घाबरला. बँकेने ही तांत्रिक चूक असण्याची शक्यता वर्तवली असून सध्या कोणत्याही प्रकारचा व्यवहार न करण्याचा सल्ला दिला आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.
गयाजी शहरातील डेल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागेश्वरी गल्लीत राहणारे शिव कुमार पटेल यांच्यासोबत ही घटना घडली आहे. शिव कुमार हे ई-रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेचे लाभार्थी देखील आहेत. शनिवारी ते आपली पेन्शन काढण्यासाठी बागेश्वरी येथील बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्रात गेले होते. तेथे त्यांनी आधार-आधारित बँकिंग सेवेद्वारे आपल्या खात्यातून ११०० रुपये काढले.
मोबाईलवरील बॅलन्स पाहून झाले हैराण
पैसे काढल्यानंतर काही वेळातच शिव कुमार यांच्या मोबाईलवर बँकेचा एसएमएस आला. जेव्हा त्यांनी आणि सीएसपी चालकाने मेसेजमधील शिल्लक रक्कम पाहिली, तेव्हा दोघेही अवाक झाले. त्या मेसेजमध्ये खात्यात तब्बल ७ अब्ज ६० कोटी रुपयांचा बॅलन्स दिसत होता. सुरुवातीला हा एखादा जोक वाटला, पण जेव्हा मेसेज पुन्हा नीट वाचला तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला.
















