32.3 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रभुताटकीच्या संशयातून ७५ वर्षीय वृद्धाला आगीच्या निखा-यावर नाचवले

भुताटकीच्या संशयातून ७५ वर्षीय वृद्धाला आगीच्या निखा-यावर नाचवले

ठाणे : गावात अघोरी कृत्य करून भुताटकी करण्याच्या संशयातून ग्रामस्थांच्या जमावाने एका ७५ वर्षीय वृद्धाला निर्दयीपणे आगीच्या जळत्या निखा-यावर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत वृद्ध होरपळून गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या केरवेळे गावात घडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील मुरबाडमधील या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण भावार्थे असे होरपळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर दुसरीकडे या घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या केरवेळे गावात लक्ष्मण भावार्थे हे वयोवृद्ध कुटुबासह राहतात. या गावातील काही ग्रामस्थांना संशय होता की, लक्ष्मण हे तंत्रमंत्र विद्या आणि अघोरी कृत्य करून भुताटकी करतात.

त्यातच ४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास केरवेळे गावात मंदिरासमोर ग्रामस्थांनी जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या रात्री जागरणाचा गोंधळ सुरू असताना गावातील राहणा-या १५ ते २० जणांनी वृद्ध लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात घुसून त्यांना घराबाहेर ओढत नेले. त्यानंतर त्यांना जागरणाच्या ठिकाणी घेऊन गेले आणि आग पेटवली होती त्या आगीच्या निखा-यावर नाचवले. हा भयानक प्रकार करत असतानाच वृद्ध लक्ष्मण यांना काही तरुण ग्रामस्थांनी तू करणी करतो असे म्हणून त्याला मारहाण देखील केली. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR