39.5 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeसोलापूरमताधिक्य टिकवण्याचे भाजपपुढे आव्हान

मताधिक्य टिकवण्याचे भाजपपुढे आव्हान

रणजित जोशी : सोलापूर
सोलापूर लोकसभेची निवडणूक चुरशीची होत असून राम सातपुते विरुध्द प्रणिती शिंदे हा सामना अटीतटीचा होत आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय साध्य केलेल्या भाजपला यंदा विजयासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.
लोकसभेची लढाई जिंकण्यासाठी प्रदेश भाजपने सूक्ष्म नियोजन केले आहे. गुप्तपणे प्रत्येक नेत्यावर नजर ठेवून त्यांच्या दिवसभरातील प्रचारसभांचा आढावा घेत आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीचा सद्य परिस्थितीचा अंदाज घेऊन भाजपपासून बदलत्या काळात लांब राहिलेल्या जुन्या नेते व कार्यकर्त्यांना निवडणूक प्रचार यंत्रणा राबविण्याच्या सूचना प्रदेश भाजपने दिल्या आहेत.

 

२०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार हे अक्कलकोट तालुक्यातील रहिवासी होते. अ‍ॅड. शरद बनसोडे आणि डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी या दोघांना तेथून चांगले मताधिक्य मिळाले होते, तर दुसरीकडे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलेच मताधिक्य मिळाले होते. त्यातून भाजप उमेदवाराचा विजयाचा मार्ग सोयीचा ठरला. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये जातीय समीकरण जुळविण्यात भाजपला यश आले होते. सन २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी अशी तिरंगी लढत झाली होती. ‘वंचित’चे डॉ. आंबेडकर हे भाजपबरोबरच काँग्रेसची व्होट बँक आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाले होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीत तयार झालेले राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. राम सातपुते यांच्या प्रचाराची धुरा त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांवर सोपविण्यात आली आहे. तरी शेवटी राजकारणात शेवटच्या टप्प्यापर्यंत काहीही होऊ शकते, हे गृहीत धरून भाजपने नियोजनावर भर दिल्याचे चित्र आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील ३५९ बूथपैकी ३११ बूथवर भाजपला, तर केवळ ४८ बूथवर काँग्रेसला मताधिक्य मिळाले होते. भाजपला तब्बल ४७ हजार ४२९ इतके मताधिक्य मिळाले होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मूळ गावातूनच ५२१ मतांचे भाजपला मताधिक्य मिळाले होते, तर आ. विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. महास्वामी यांना तब्बल ६३ हजार ६६७ मताधिक्य मिळाले होते. ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २१ हजार ७५४ मताधिक्य अधिक होते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील मताधिक्य कायम टिकविण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. याबरोबरच अन्य मतदारसंघांमध्ये आघाडी मिळवणे आवश्यक आहे.

आमदार असले तरी त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यासच भाजपचे विजयाचे स्वप्न साकार होऊ शकेल अन्यथा दगाफटका झाल्यास त्याची किंमत चुकवावी लागू शकते. भाजपमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सक्रिय करावे लागणार असून फक्त आमदारांवर अवलंबून रणनीती आखल्यास खेळ फसण्याची शक्यता असते. सोलापूर शहर व जिल्ह्यात काँग्रेसचे व महाविकासआघाडीचे कार्यकर्ते तळागाळात असून लोकसभेचा प्रचारही करत आहेत. प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे त्यामुळे भाजपसाठी ही लढाई सोपी नाही. राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. हा खेळ कसा खेळायचा हे केवळ राजकीय नेते ठरवत नाहीत, मतदारही ठरवत असतो. त्यामुळे मतदारांना गृहीत धरून चालत नाही अन्यथा सुज्ञ मतदार निवडणुकीत जागा दाखवतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR