29.8 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमोदींकडून मंगळसूत्रावर हात

मोदींकडून मंगळसूत्रावर हात

छ. संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांच्या मंगळसूत्रावरून केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यांनी मोदींवर टीकेची झोड उठवत जो माणूस स्वत:च्या घरातील मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही, त्याने दुस-यांच्या मंगळसूत्राची उठाठेव करू नये, असा सल्ला दिला आहे. तसेच नरेंद्र मोदी हे बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालायला लागलेत. पाकीटमारी करायला लागलेत, हीच भाजपची भूमिका आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.

नरेंंद्र मोदींनी मंगळसूत्रावर केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी हे बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालायला लागलेत. पाकीटमारी करायला लागलेत, हीच भाजपची भूमिका आहे का? खरंतर काँग्रेसच्या राज्यात नाही, तर भाजपच्या राज्यात महिलांचे मंगळसूत्र गहाण पडत आहेत. जो माणूस घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही, त्याने दुस-यांच्या मंगळसूत्राची उठाठेव करू नये.

या देशातील महिलांची मंगळसूत्रं का लुटली गेली, का विकली गेली? मोदींनी जी नोटबंदी आणली त्यासाठी लाखो महिलांना मंगळसूत्रं गहाण ठेवावी लागली, विकावी लागली. मोदींनी जे लॉकडाऊन केले त्यामुळे हजारोंचा रोजगार गेला. त्यावेळेला लाखो महिलांना आपलं मंगळसूत्र विकून आपलं घर चालवावं लागलं.

काश्मीरमधील पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्रं ही मोदी व भाजप पुरस्कृत दहशतवाद्यांकडून लुटली गेली. मणिपूरमध्ये देखील महिलांची मंगळसूत्रं गेली. त्याला देखील मोदी जबाबदार आहेत. किती मंगळसूत्रांची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली? या देशात महिलांच्या मंगळसूत्रावर गडांतर आला असेल तर ते नरेंद्र मोदींमुळे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे, पवार गट राजकारणातून नामशेष होणार
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रचार गीतावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, चार जूननंतर एकनाथ शिंदे गट हा पूर्णपणे संपलेला असेल. त्यांचा एकही खासदार निवडून येत नाही. तुम्ही कोणतेही गीता तयार करा किंवा अजून काय तयार करा. एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट चार जूननंतर या राज्याच्या राजकारणातून पूर्णपणे नामशेष झालेले असतील. या दोघांचा एकही खासदार निवडून येत नाही, असे भाकित राऊत यांनी वर्तवले आहे.

सांगलीतील काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे, यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, भाजपने त्या ठिकाणी दोन उमेदवार ठेवले आहेत. आमच्या पहिलवानाशी लढत द्यायला एक उमेदवार कमी पडत आहे, त्यामुळे भाजपने दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवला आहे. यावर आम्ही योग्य वेळी बोलू.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR