36.3 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeराष्ट्रीयवक्फ बोर्ड घोटाळा प्रकरणी अमानतुल्लाह खान यांना अटक

वक्फ बोर्ड घोटाळा प्रकरणी अमानतुल्लाह खान यांना अटक

नवी दिल्ली : वक्फ बोर्ड घोटाळयाशी संबंधित हवाला व्यवहार प्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना सक्तवसुली संचलनालयाने गुरुवारी रात्री अटक केली. नऊ तासांच्या चौकशीनंतर खान यांना अटक झाली, हे विशेष. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने खान यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावत त्यांना ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते.

वक्फ बोर्ड घोटाळा प्रकरणात ईडीने खान यांच्या तीन सहका-यांविरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. दोषारोप पत्रात अद्याप खान यांचे नाव सामील नाही. दोषारोपपत्र दाखल असलेल्यांत जावेद सिद्दीकी, दाउद नासिर आणि कौसर सिद्दीकी यांचा समावेश आहे. दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना खान यांनी नियमांचे उल्लंघन करीत ३२ लोकांची भरती केल्याचा तपास संस्थांचा आरोप आहे. वक्फ बोर्डाची संपत्ती भाड्याने दिल्याचा तसेच बोर्डाच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

खान हे सकाळी अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. अमानतुल्लाह यांच्या ठिकाणांवर तपास संस्थांनी छापे टाकत कागदपत्रे ताब्यात घेतली होती. चौकशीसाठी हजर रहावे, असे सांगत ईडीने त्यांना सहावेळा समन्स बजावले होते. मात्र दरवेळी खान यांनी समन्सकडे दुर्लक्ष केले होते. या पार्श्वभूमीवर कनिष्ठ न्यायालयाने त्यांच्याविरोधात नोटीस जारी केली होती.

खान यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यास परवानगी दिली जावी, असे सांगत ईडीने न्यायालयात याचिका दाखल केल्यावर खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दिला होता. तथापि चौकशीसाठी ईडीसमोर उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने खान यांना दिले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR