Homeराष्ट्रीयसाखरपुड्यानंतर भावी नवरा-नवरीत होणा-या गप्पांवर बंदी!

साखरपुड्यानंतर भावी नवरा-नवरीत होणा-या गप्पांवर बंदी!

साखरपुड्यानंतर तुटणा-या नात्यांचे प्रमाण वाढले सेन समाजाने लावले विविध सामाजिक बंधन

बालोद : छत्तीसगडमधील सेन समाजाने साखरपुड्यानंतर लग्नापूर्वी तरुण-तरुणींमध्ये होणा-या मोबाइल संवादावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. साखरपुड्यानंतर तुटणा-या नात्यांचे प्रमाण वाढत असल्याचे पाहून समाजाने हे पाऊल उचलले आहे. या नव्या नियमांनुसार, आता होणा-या पती-पत्नीला एकमेकांशी फोनवर एकांतात बोलता येणार नाही; अत्यंत आवश्यक असल्यास त्यांना आपल्या पालकांसमोरच संवाद साधावा लागेल.

सेन समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष कौशिक आणि प्रदेश संघटन मंत्री गौरी शंकर श्रीवास यांच्या मते, साखरपुड्यानंतर भावी नवरा-नवरी तासनतास फोनवर बोलतात. या संवादादरम्यान अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात किंवा एकमेकांचे विचार न पटल्याने लग्न मोडण्यापर्यंत परिस्थिती जाते. सध्या बालोद जिल्ह्यात लागू असलेला हा नियम लवकरच संपूर्ण प्रदेशात लागू केला जाण्याची शक्यता आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीने अन्य धर्म स्वीकारल्यास त्याच्याशी रोटी-बेटीचे संबंध तोडले जातील, असा इशाराही सेन समाजाकडून नव्या फतव्यात देण्यात आला आहे. अनेकांना असे वाटते की लग्न ठरले वा साखरपुडा झाला म्हणजे सर्व मार्ग बंद झाले.

जर हे लग्न मोडले तर सगळीकडे नाचक्की होईल. पण लग्न हे आपण समाजासाठी नाही तर स्वत:साठी करतो. उद्या भविष्य खराब झाल्यावर सुद्धा समाजात आणि लोकांमध्ये नाचक्की होणारच की..! त्यामुळे जर भविष्याची खात्री नसेल आणि मनापासून या नात्यात पुढे जाण्याची इच्छा नसेल तर वेळीच निर्णय घ्यावा. कधीच मार्ग संपत नसतो. तुम्ही जो निर्णय घ्याल त्यानुसार नवीन मार्ग सुरु होत असतो. ती एक नवीन सुरुवात असते. त्यामुळे माणसाने नेहमीच आपल्या भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावेत.

बूट लपवण्याच्या प्रथेलाही फाटा
मोबाइलच नव्हे, तर लग्नात मेहुणीद्वारे नव-या मुलाचे बूट लपवण्याची प्रथा आता बंद करण्यात आली आहे. कारण यामुळे दोन्ही पक्षांत वादाची स्थिती निर्माण होते. साखरपुड्याच्या कार्यक्रमात केवळ १५ ते २० लोकांनाच नेण्याची परवानगी असेल.

नव्या पिढीमध्ये मतमतांतरे
समाजातील काहींनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी, काही तरुणांनी याला वैयक्तिक स्वातंर्त्यावर गदा असल्याचे म्हटले आहे. आयुष्यभर सोबत राहणा-या जोडीदाराला समजून घेण्यासाठी संवाद आवश्यक आहे, असे मत या गटाने मांडले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR