30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्र२६ तारखेपर्यंत निर्णय घ्या; अ‍ॅड. आंबेडकरांचा अल्टिमेटम

२६ तारखेपर्यंत निर्णय घ्या; अ‍ॅड. आंबेडकरांचा अल्टिमेटम

मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा. आम्ही २६ तारखेपर्यंत थांबणार आहोत. त्यांच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी एक महत्त्वाची घोषणाही केली आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अखेर फारकत झाली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. आता महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती. नाही तर युती नाही, अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली.

प्रकाश आंबेडकर ठाकरेंसोबतच्या युतीतून आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास पुन्हा एकदा राज्यातील राजकीय समीकरणांची उलटफेर होणार आहे. आंबेडकर यांच्या या निर्णयाने महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सर्वांना ४८ जागा लढवाव्या लागतील
महाविकास आघाडीचा तिढा मिटणार नसेल तर आमची एन्ट्री होऊन काय उपयोग आहे. आज सकाळी आम्ही सांगितले आहे. २६ तारखेपर्यंत आम्ही थांबणार अन्यथा आमची भूमिका जाहीर करणार आहोत. यामध्ये काँग्रेसला सात जागांना पाठिंबा देऊ. आम्ही काँग्रेसला चॉईस दिली आहे. जर त्यांचे जमले नाही तर प्रत्येकाला ४८ जागा लढवाव्या लागतील. त्यात काँग्रेस ४८ जागा लढत असेल तर सात जागांना आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

शाहू महाराजांना आमचा पाठिंबा
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे. हा निर्णय तिन्ही पक्षांकडून घेण्यात आला आहे. शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीने सर्व प्रयत्न केले जातील. मागे जे घडले ते यावेळी घडू द्यायचे नाही, याची दक्षता घेण्यात येईल. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचे नाव घोषित करण्यात आले. त्यांना आमचा पाठिंबा आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR