33.9 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeपरभणीमहिलांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न व्हावेत

महिलांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न व्हावेत

परभणी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे यांच्या सारख्या अनेक स्त्रीयांनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्त्वाचे योगदान दिल्यानेच आज मुली शिक्षणाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभ्या राहत आहेत. परंतु ब-याचदा महिलांना कुटूंब आणि समाजात वावरत असताना मानसिक छळास सामोरे जावे लागते. अशा वेळी तिच्या कुटुंबातून तिला मानसिकरित्या सक्षम करण्यासाठीचे प्रयत्न होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ. खुशबू देशमुख यांनी केले.

येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील नवोपक्रम मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आणि समाजशास्त्र विभागाच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, प्रा.अप्पाराव डहाळे, प्रा. मंजिरी भाटे, रासेयो प्रमुख डॉ.तुकाराम फिसफिसे, डॉ.चैतन्य खिल्लारे उपस्थित होते. आजच्या स्त्री पुढील आव्हाने याविषयावर बोलताना डॉ. देशमुख पुढे म्हणाल्या, आजच्या स्त्रीने स्वत:च्या क्षमता ओळखून आपले करिअर निवडले पाहिजे.

चुल-मूल आणि कुटुंब इतक्या पुरते मर्यादित न राहता आपल्या व्यक्तिमत्त्वाची झलक समस्त समाजाला दाखविली पाहिजे. साध्या राहणीमानाचा अवलंब करून उच्च विचारसरणीच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. तिला प्रसंगानुरूप वागता-बोलता आले पाहिजे. नेहमीच मेणाची बाहुली बनून दु:ख आणि परिस्थितीला कवटाळून बसू नये. वेळ प्रसंगी झाशीची राणी होता आले पाहिजे. आजच्या युवकांनी शिवरायांचे विचार डोळ्यासमोर ठेऊन स्त्रियांचा आदर केला तर स्त्रियांना कोणत्याच समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही असेही त्या म्हणाल्या.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले, युवतींनी स्वत:च्या तब्बेतीची काळजी घेत आपले व्यक्तिमत्त्व तयार करणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य कसे चांगले राहिला याकरिता प्रयत्न केले पाहिजेत. मानसिक आरोग्यासाठी विविध पुस्तकांचे वाचन, चिंतन आणि मनन केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सदरील कार्यक्रमात महाविद्यालयात विविध पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविक प्रा.मंजिरी भाटे, सूत्रसंचालन अस्मिता जाधव, आभार डॉ.तुकाराम फिसफिसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.राजेसाहेब रेंगे, डॉ.विजय परसोडे, सय्यद सादिक, सुरेश पेदापल्ली, साहेबराव येलेवाड, श्रीकांत खटिंग, प्रकाश ढाले आदींनी पुढाकार घेतला. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR