31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeपरभणीपरभणी मतदारसंघात दिग्गजांच्या सभांचा धुरळा

परभणी मतदारसंघात दिग्गजांच्या सभांचा धुरळा

प्रवीण चौधरी
परभणी : परभणी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, इतर छोट्या पक्षांसह अपक्ष उमेदवाराच्या प्रचारार्थ दिग्गज नेतेमंडळींनी घेतलेल्या प्रचार सभांचा चांगलाच धुरळा उडाला असून अटीतटीच्या होत असलेल्या या निवडणुकीत मतविभागणीचा नेमका फटका कोणाला बसणार याकडे लक्ष लागले आहे.

परभणी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणात ३४ उमेदवार उतरले आहेत. यात महाविकास आघाडीचे खा. संजय ऊर्फ बंडू जाधव, महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासह अन्य पक्षांचे ११ व अपक्ष २१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार जानकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री भागवत क-हाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री संजय बनसोडे, मंत्री अतुल सावे, माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी दिग्गजांनी मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार खा. जाधव यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे आदींच्या सभा झाल्या. वंचितचे उमेदवार पंजाबराव डख यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांनीही सभा घेतली.

याबरोबर इतर पक्ष व अपक्षांकडूनही कॉर्नर मीटिंग व सभा घेतल्या. दरम्यान या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जातीपातींसह विकासाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सर्वच पक्षांकडून विकासाबाबत आपली भूमिका मांडण्यात येत आहे. निवडणुकीच्या रिंगणातील २१ अपक्षांमुळे प्रमुख उमेदवारांची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. मतविभाजन होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आता मतदानाला केवळ काही तास उरलेले असल्याने उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आटोकाट प्रयत्न करीत असून मतदानाच्या शेवटपर्यंत मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरूच राहणार आहे. अटीतटीच्या होत असलेल्या या निवडणुकीत मात्र मतदार अद्यापही काहीही बोलण्यास तयार नसला तरी प्रत्येक उमेदवाराचे समर्थक आपलाच विजय होईल असे ठामपणे सांगताना दिसत आहे. दरम्यान अपक्ष उमेदवाराला मिळणा-या मतांचा फटका कोणाला बसणार हे लवकरच समोर येणार आहे. तूर्तास तरी आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवार व समर्थक भर देताना दिसत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR