36.2 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात उष्णतेची लाट, राज ठाकरे यांनी केले महत्त्वाचे आवाहन

राज्यात उष्णतेची लाट, राज ठाकरे यांनी केले महत्त्वाचे आवाहन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशभरात उन्हाचा कडाका कमालीचा वाढला आहे. महाराष्ट्रातही उष्णतेची लाट आली असून, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंशांच्या वर जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून राज्य सरकारसह राज्यातील जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे.

वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने मुलांना तातडीने उन्हाळ्याची सुटी जाहीर करण्याचे आदेश शाळांना द्यावेत, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच निराधार, बेघर लोक आणि प्राणी-पक्ष्यांना पुरेसे पाणी मिळेल याची तजवीज करावी, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्र सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांना केले आहे.

सरकार आणि जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये राज ठाकरे लिहितात की, गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण या भागात दिवसाचे सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेले आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाही. उष्णतेची लाट आली आहे, असे जाहीर झाले आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्या सुरू व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावे लागत आहे. याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुटी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

या पत्रामध्ये राज ठाकरे पुढे लिहितात की, उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचे नियोजन करता येईल. माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वत:ची काळजी घ्या. तसेच या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात ते प्राण्यांचे-पक्ष्यांचे आणि निराधार-बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याची तजवीज करा. त्याबरोबरच प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR