37.3 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा

उन्हाचा ताप वाढला, पारा आणखी चढणार,

मुंबई : मुंबईमध्ये उन्हाचा ताप आता जाणवू लागला असून उद्या, गुरुवारपर्यंत मुंबईच्या तापमानाचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे. हे तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचू शकते, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबईचे कमाल तापमान मंगळवारी अवघ्या २४ तासांमध्ये २.२ अंशांनी वाढले. कोकणामध्ये दमट आणि उष्ण हवामानामुळे अधिक त्रास जाणवू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत मंगळवारी कुलाबा येथे ३२.२ तर, सांताक्रूझ येथे ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सोमवारपेक्षा कुलाबा येथे १.४ तर सांताक्रूझ येथे २.२ अंशांनी अधिक कमाल तापमान नोंदवले गेले. मुंबईच्या किमान तापमानामध्येही वाढ नोंदवली गेली असून कुलाबा येथे २३ तर सांताक्रूझ येथे २२.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.

मध्य महाराष्ट्रात किमान तापमान तुरळक ठिकाणी १६ ते १७ अंशांदरम्यान आहे. मात्र कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३८ अंशांदरम्यान पोहोचला आहे. जळगाव येथे ३६.७, जेऊर येथे ३७.५, कोल्हापूर येथे ३६.१, सांगली येथे ३७.२, सोलापूर येथे ३८.४ याप्रकारे कमाल तापमान मंगळवारी नोंदवले गेले. हे तापमान आत्ताच्या सरासरीच्या आसपास आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR