28.6 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रसाता-यात भाजपकडून उदयनराजेंनाच तिकिट

साता-यात भाजपकडून उदयनराजेंनाच तिकिट

लवकरच अधिकृत घोषणेची शक्यता

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून साता-याच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरू आहेत. अशातच आता साता-याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. उदयनराजेंची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून उद्याच घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहितीही रणजित नाईक निंबाळकरांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीनंतर निंबाळकरांनी ही माहिती दिली आहे.

भाजपचे विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर बोलताना म्हणाले की, सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र महायुतीच्या प्रचाराचा नारळ माढा लोकसभेतील माळशिरस येथे फुटणार आहे. तसेच, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहयोगी पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर उपमुख्यमंत्री आपले कुलदैवत असणा-या नीरा नरसिंहपूर येथे जाऊन नरसिंहाचे दर्शन घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

साता-यात झळकले उदयनराजेंचे पोस्टर्स
उद्या उदयनराजेंचा साता-यात भव्य स्वागत सोहळा पार पडणार आहे. शिरवळपासून साता-यात ठिकठिकाणी स्वागत केले जाणार आहे. अद्याप उदयनराजेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. अशातच तिकिट जाहीर होण्या अगोदरच उदयनराजेंच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती मिळाली असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR