39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याविमान खरेदी घोटाळा प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना दिलासा

विमान खरेदी घोटाळा प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना दिलासा

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात सुरु असलेल्या कथित घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयने आता बंद केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्यावर यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असताना एअर इंडियासाठी विमान खरेदी व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणावरुन त्यांच्याविरोधात विरोधकांकडून प्रचंड टीका करण्यात आली होती. संबंधित कथित प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्यावर सरकारचे ८४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, असा आदेश दिला होता. या आदेशानंतर या सर्व कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता.

सीबीआयने प्रफुल्ल पटेल विरुद्ध एअर इंडिया लीज्ािंग प्रकरणाच्या संदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने अर्थात सीबीआयने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर २०१७ मध्ये नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयने मे २०१७ मध्ये या प्रकरणी संबंधित अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

सीबीआयकडून नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियासाठी विमान भाडेतत्त्वावर घेण्याच्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यात आली. सुमारे ७ वर्षे या प्रकरणाचा तपास केल्यानंतर सीबीआयने प्रफुल्ल पटेल, एमओसीए आणि एअर इंडियाच्या तत्कालीन अधिका-यांना क्लीन चिट देऊन तपास बंद केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२४ मध्ये सक्षम न्यायालयासमोर क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR