30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपला ३५० जागा मिळतील; अर्थतज्ञांनी व्यक्त केले भाकित

भाजपला ३५० जागा मिळतील; अर्थतज्ञांनी व्यक्त केले भाकित

मोदींना पर्यायी चेहरा नसणे ही कॉँग्रेसची अडचण

नवी दिल्ली : प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक सुरजित भल्ला यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाबाबत भाकित केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप अधिक यश मिळवेल असे ते म्हणाले आहेत. ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अंदाज व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३३० ते ३५० पर्यंत जागा मिळवेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सुरजित भल्ला यांचे ‘हाऊ वुई वोट’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मतदार मतदान करताना कोणत्या गोष्टींचा विचार करतात, त्यांची मानसिकता कशी असते याबाबत हे पुस्तक आहे.

सांख्यिकीय माहितीच्या आधारावर भाजपला ३३० ते ३५० जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागा फक्त भाजपच्या आहेत, राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएला यापेक्षा जास्त जागा मिळतील असे भल्ला म्हणाले. २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये ५ ते ७ टक्क्यांनी वाढ होईल असा दावा देखील त्यांनी केला.

सुरजित भल्ला यांनी काँग्रेसच्या जागांबाबत देखील भाकित केले. काँग्रेसला ४४ जागा मिळतील. २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये काँग्रेसच्या जागा २ टक्क्यांनी कमी होतील असा दावा त्यांनी केला. विरोधकांकडे चेहरा नसणे ही त्यांची मोठी समस्या आहे, असे ते म्हणाले.

अर्थव्यवस्था सर्वात जास्त महत्त्वाची ठरते, त्यानंतर नेतृत्त्वाचा प्रश्न येतो. सध्या अर्थव्यवस्था आणि नेतृत्व दोन्ही भाजपच्या बाजूने आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत किमान ५० टक्के मान्यतेचा, पण ज्याला लोक चांगली पसंती देतील अशा उमेदवाराला काँग्रेसने समोर आणले तर निवडणुकीत काहीशी लढत होऊ शकते. अन्यथा ही लढत एकतर्फीच असेल असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR