कौसडी : जिल्हा परिषद प्रशाला कौसडीच्या इयत्ता ५वी व ८ वी वर्गातील ५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहे. या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
इयत्ता ५वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतून फरहान पठाण, गणेश काळे, श्रावणी फुलारी व वेदिका ढवळशंख हे ४ विद्यार्थी तर इयत्ता ८वीच्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतून सुप्रिया खंडू लेंगुळे ही विद्यार्थिनी पात्र ठरली आहे. पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा शिष्यवृत्ती मिळणार असून त्यांच्या पुढील शिक्षणास आर्थिक हातभार लागणार आहे.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक राधेश्याम वाढवे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच विषय शिक्षक सुशीला नवले, मनोज भालेराव, अभिजीत मोरे यांनी विशेष परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार केले. या यशाबद्दल मुख्याध्यापक वाढवे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी हा एक आदर्श आहे, असे गौरवोद्गार मुख्याध्यापकांनी काढले. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने लवकरच सत्कार समारंभ आयोजित करून गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कौसडी गावासह परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
















