30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeराष्ट्रीयपहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी मोदींचा १०० दिवसांचा प्लॅन तयार

पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी मोदींचा १०० दिवसांचा प्लॅन तयार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शीगेला पोहचला आहे. सर्व पक्षांचे नेते विविध ठिकाणी रॅली-प्रचारसभा घेत आहेत. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विरोधकांना तुरुंगात पाठवल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपांचे खंडन करत म्हटले की, अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवलेले बहुतांश खटले अशा व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध आहेत ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. प्रामाणिक व्यक्तीला घाबरण्याचे कारण नाही, परंतु भ्रष्टाचारी लोकांना सोडले जाणार नाही. यासोबतच त्यांनी तिस-या टर्मची तयारी सुरू असून १०० दिवसांच्या योजना तयार असल्याचा दावाही केला.

मोदी आपल्या प्रत्येक भाषणात २०२४ नाही, तर २०४७ लक्ष्य असल्याचे सांगतात. याबाबत बोलताना ते म्हणाले की, माझ्याकडे २५ वर्षांचे व्हिजन आहे. जेव्हा देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर अमृत महोत्सव साजरा करत होता, त्यावेळी मी हा विषय सर्वांसमोर ठेवायला सुरुवात केली. २०४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून १०० वर्षे पूर्ण होतील, साहजिकच हा टप्पा खुप मोठा आहे. या येणा-या २५ वर्षांचा सदुपयोग कसा करावा, हे प्रत्येकाने निश्चित केले पाहिजे. तिस-या टर्मबाबत बोलताना मोदी म्हणाले, यासाठी आमचा १०० दिवसांचा प्लॅन तयार आहे. अजून देशासाठी खूप काही करायचे आहे.

आपल्या देशाला अजून किती आणि कशाची गरज आहे, हे मी जाणतो. म्हणूनच मी नेहमी म्हणतो की, जे झाले ते ट्रेलर आहे, अजून खूप बाकी आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच मी याबाबत नियोजन सुरू केले होते. २०४७ डोळ्यासमोर ठेवून मी गेली दोन वर्षे काम करत आहे. येत्या २५ वर्षात देश कसा असावा, याबाबत मी देशातील सुमारे १५ लाख लोकांकडून सूचना घेतल्या. पुढील २५ वर्षांच्या व्हिजनसाठी प्रत्येक विभागात अधिका-यांची टीम तयार केली. एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही तयार करत आहोत. निवडणूक झाल्यानंतर निती आयोगाची बैठक बोलावून सर्वसमावेशक चर्चा केली जाईल. निवडणुका संपल्याबरोबर सर्व राज्यांनी यावर काम करावे असेही मोदी यावेळी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीतही मी १०० दिवसांचे काम घेऊन मैदानात उतरलो होतो. आमची पुन्हा सत्ता आली, तेव्हा पहिल्या १०० दिवसांत कलम ३७० रद्द केली, पहिल्या १०० दिवसांत मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकपासून मुक्त केले. सुरक्षेसंदर्भातील यूएपीए विधेयक १०० दिवसांत मंजूर झाले. बँकांचे विलीनीकरण हे मोठे काम होते, ते आम्ही १०० दिवसांत पूर्ण केले. एवढेच नाही तर, मी जवळपास १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करुन जनावरांच्या लसीकरणासाठी मोठी मोहीम राबवली. हे सर्व मी पहिल्या १०० दिवसात केले. त्यामुळे १०० दिवसांत मला कोणते काम करायचे, याचे नियोजन मी आधीच करतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR