लातूर : प्रतिनिधी
एका तलाठ्याच्या चुकीमुळे ७/१२ उता-यावर २६ वर्षांपूर्वी झालेली चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करणा-या एका ८५ वर्षीय वृद्धाला लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या संवेदनशीलतेमुळे अखेर न्याय मिळाला आहे. वयोवृद्ध शेतकरी प्रभाकर प्रयाग यांचा काही वर्षांपासून रेंगाळलेला ७/१२ दुरुस्तीचा प्रश्न जिल्हाधिका-यांनी केवळ दोन दिवसांत मार्गी लावला.
येथील रहिवासी प्रभाकर विनायकराव प्रयाग (वय ८५) यांची खोपेगाव शिवारात वडिलोपार्जित जमीन आहे. २६ वर्षांपूर्वी वासनगाव तलावाच्या कालव्यासाठी या परिसरातील जमीन संपादित करण्यात आली होती. हा कालवा वास्तविक प्रभाकर प्रयाग यांच्या भावाच्या शेतातून गेला होता. मात्र, तत्कालीन तलाठ्याच्या नजरचुकीमुळे प्रयाग यांच्याही ७/१२ वर ‘६ आर’ जमीन संपादित झाल्याची नोंद करण्यात आली. ही चुकीची नोंद काढण्यासाठी प्रयाग मागील काही वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागत होते, मात्र हा तांत्रिक पेच सुटत नव्हता.
या प्रकरणाची वस्तुस्थिती जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी विलंब न लावता स्वत: या प्रकरणाची फाईल मागवून घेतली. प्रकरणाचे गांभीर्य आणि प्रयाग यांचे वय लक्षात घेऊन त्यांनी संबंधित विभागाला तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. जिल्हाधिका-यांच्या या आदेशानंतर प्रशासकीय यंत्रणेने चक्रे फिरवून अवघ्या २ दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्रुटीमुक्त नवीन ७/१२ तयार केला. गुरुवार, १४ मे रोजी जिल्हाधिका-यांनी प्रयाग यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांच्या हाती दुरुस्त केलेला ७/१२ सुपुर्द केला. २६ वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याने प्रयाग यांनी अत्यंत भावूक होत जिल्हाधिका-यांचे आभार
मानले.

