हैदराबाद : आयपीएल २०२६ च्या २७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सचा १० धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ईशान किशनच्या नेतृत्वाखाली हैदराबादने शानदार विजय मिळवला. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून ६ सामन्यांत ६ गुणांसह टॉप-४ मध्ये एन्ट्री मारली.
हैदराबादने अत्यंत स्फोटक सुरुवात केली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने २३ धावा केल्या. पण ख-या अर्थाने मैदानात वादळ आणले ते अभिषेक शर्माने. अभिषेकने अवघ्या १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि २२ चेंडूत ५९ धावांची तुफानी खेळी खेळली. त्यानंतर हेनरिक क्लासेननेही ३९ चेंडूत ५९ धावांचे योगदान दिले. मात्र, शेवटच्या षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी पुनरागमन केल्याने हैदराबादला २०० चा टप्पा ओलांडता आला नाही. सीएसकेकडून वेगवान गोलंदाजांनी आज प्रभावी कामगिरी केली. जेमी ओव्हरटन आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स टिपले. मुकेश चौधरीने सलग दोन चेंडूंवर २ विकेट्स घेतल्या तर गुरजपनीत सिंगला १ विकेट मिळाली नूर अहमद आज विकेट मिळवू शकला नाही, तरीही त्याने ४ षटकांत केवळ ३३ धावा देत धावगतीवर लगाम लावला. १९५ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. त्यानंतर चेन्नईने डाव सावरत विजयासमिप झेप घेतली. परंतु अखेरच्या टप्प्यात चेन्नईची घसरगुंडी झाल्याने चेन्नईने १० धावांत सामना गमावला.

