34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषअन्ननासाडीचे भेदक वास्तव

अन्ननासाडीचे भेदक वास्तव

अन्नाच्या नासाडीसंदर्भात अलिकडेच संयुक्त राष्ट्र संघटनेने अहवाल जारी केला आहे. त्यानुसार जगभरात दररोज जवळपास एक अब्ज ताटांइतके अन्न वाया जाते असे दिसून आले आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी ७९ किलो अन्न वाया घालवतो, असे हा अहवाल दर्शवतो. अर्थात ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. तसेच जगभरातील एकूण उत्पादनाच्या ३० टक्के खाद्यान्न वाया जात असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. एकट्या अमेरिकेत वाया जाणा-या अन्नाचे प्रमाण हे सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस असलेल्या आफ्रिकी देशांची गरज भागवणारे आहे. त्याचवेळी इटलीत वाया जाणारे अन्न हे इथिओपियाची भूक भागवणारे आहे. अन्नाची ही नासाडी एकूण ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनात एक तृतीयांश योगदान देते. या अहवालात वाया जाणा-या अन्नांमुळे उत्सर्जित होणा-या ग्रीन हाऊस गॅसच्या हवामानबदलावर, पर्यावरणावर आणि पोषणावर होणा-या परिणामांची चर्चा केली आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाजू आहे. कारण अन्नसुरक्षेबरोबरच पर्यावरण वाचविण्याचा मुद्दा देखील यात मांडला आहे.

अन्ननासाडीच्या मुद्याचे गांभीर्य समजून घेण्यापूर्वी आपल्याला जगभरातील खाद्यपदार्थांच्या उपलब्धतेबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. जगाची लोकसंख्या सध्या सुमारे ७.८ अब्ज आहे आणि ती २०५० पर्यंत नऊ अब्जांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. जगभरात अन्नाधान्याचे उत्पादन पाहता ते १४ अब्ज लोकांसाठी पुरेसे आहे. याचाच अर्थ आपण गरजेपेक्षा दुप्पट उत्पादन घेत आहोत. समाजातील एका घटकासाठी त्याचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक आहे, तर त्याचवेळी दुसरा वर्ग अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करत आहे. एकीकडे ३० टक्के मुले लठ्ठपणाचा सामना करत आहेत तर दुसरीकडे जगभरातील १२ टक्के लोकसंख्येकडे पुरेसे भोजन नाही. अर्थातच ही विसंगती असून जगभरातील धोरणकर्त्यांसाठी ती गंभीर बाब म्हणून आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. ज्येष्ठ कृषीअभ्यासक देविंदर शर्मा यांच्या मते, आपण या समस्येंवर दोन मार्गांनी तोडगा काढू शकतो. पहिले म्हणजे जगातील ढासळते पर्यावरण पाहता आपण धान्योत्पादनावर कमी भर द्यायला हवा आणि दुसरीकडे अन्नाची नासाडी रोखायला हवी. यानुसार आपण जगाची गरज तात्काळ भागवू शकतो. तसेच यामुळे अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी राहील आणि गरजेपेक्षा अधिक धान्योत्पादन करण्याची आवश्यकताही राहणार नाही.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार अन्नाच्या एकूण नासाडीपैकी ६० टक्के भोजन हे घरगुती पातळीवरच वाया जाते आणि १३ टक्के पुरवठा साखळीत खराब होते. सर्वांत कमी रिटेल म्हणजेच दुकानात नुकसान होते. ग्रामीण भागात भोजनाची सर्वांत कमी नासाडी होते, असे म्हटले आहे. यामागचे कारण म्हणजे आपल्या धर्मात मनुष्यप्राण्याबरोबरच प्राणिमात्राचाही विचार केला आहे. वास्तविक आपण जेव्हा अन्नसुरक्षेचा विचार करतो तेव्हा त्यात मनुष्याबरोबरच प्राण्यांचाही समावेश होतो. गावात मनुष्याबरोबर, गाय, श्वान, पक्षी आदींची देखील अन्नसुरक्षा पाहतो. त्यामुळे अन्नपदार्थ शिल्लक राहिला तरी तो वाया जाऊ दिला जात नाही. गावातील कुत्रे, शेळ्या, गायी-म्हशी यांना दिला जातो. खराब झालेल्या अन्नाचे कंपोस्ट केले जाते. म्हणून अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ग्रामीण भागाकडून शिकायला हवे. शहरांमध्ये बहुतांश फ्लॅटमध्ये-घरांमध्ये राहिलेले अन्न एक तर बेसिनमध्ये टाकून पाण्याद्वारे ड्रेनेजमध्ये ढकलले जाते किंवा डस्टबीन बॅगमध्ये भरून कच-यात टाकले जाते. पशुपक्ष्यांना अन्न देण्याचा विचार शहरात फारसा दिसतही नाही आणि तशा सुविधाही फारशा नाहीत. अलीकडील काळामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण केले जाऊ लागल्याने वाया जाणा-या अन्नापासून कंपोस्ट करण्याचे प्रमाण वाढले आहे, ही त्यातल्या त्यात सुदैवाची बाब म्हणायला हवी.

कृषीसंस्कृती अद्यापही कायम असणा-या गावाखेड्यांमध्ये मनुष्य आणि प्राणी यांचे घनिष्ठ नाते असते. शहरात तसे बंध पाहायला मिळत नाहीत. शहरांमधील अन्ननासाडीमध्ये हॉटेल आणि समारंभांमध्ये होणारी नासाडी अधिक दिसून येते. आपण सहज जरी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये नजर टाकल्यास उच्चशिक्षित, उच्चभ्रू म्हणवले जाणारे आणि आलिशान गाड्यांमधून आलेले लोक हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या डिशमध्ये सर्रास अन्नपदार्थ सोडून जाताना दिसतात. त्याचे जराही वैषम्य त्यांना वाटत नाही. बहुतांश हॉटेलचालक उरलेले अन्न पार्सल म्हणून घरी देण्यास तयार असतात; पण तथाकथित उच्चभू्रंना त्यात कमीपणा वाटतो. हाच सुशिक्षित, सधन वर्ग आलिशान पार्ट्यांमध्ये, लग्नसमारंभांमध्ये गेल्यानंतर बुफे सिस्टीममध्ये आपल्या हाताने स्वादिष्ट व्यंजने भरमसाठ प्रमाणात ताटात वाढून घेतो आणि बिनधास्तपणाने त्यातील बरेचसे अन्न ताटामध्ये ठेवून ती डिश प्लेटबॉक्समध्ये टाकून निघून जातो.

विशेष म्हणजे हाच वर्ग गरीब लोक अन्न वाया घालवतात, असा आरोप करताना दिसतो. वास्तविक गरीब, ग्रामीण भागातील नागरिकांना खूप कष्टाने दोन वेळचे अन्न मिळते. त्यामुळे ते अन्न वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. शहरात अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी जागरूकता वाढविणे गरजेचे असून त्याकडे लक्ष द्यायला हवे. यात माध्यमांची आणि सेलिब्रिटीज प्रामुख्याने नायक नायिका, क्रिकेटपटू यांची भूमिका मोलाची आहे. भोजन वाया जाऊ नये यासाठी त्यांनी समाजात जागरूकता आणायला हवी. याशिवाय अन्य काही गोष्टींवर महत्त्वाची चर्चा करणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे ४० टक्के अन्न वाया जात असल्याचे म्हटले जाते. तीस वर्षांपूर्वी देखील हीच गोष्ट म्हटली जायची आणि आजही तोच पाढा वाचला जातो. परंतु त्याचा आधार शोधण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही किंवा त्याचा आधार काय? लुधियाना येथील आयसीएमआरची संस्था सीफेट (सीआयपीएचईटी) ने भारतातील अन्ननासाडीबाबत केलेल्या अभ्यासात म्हटले, अन्नधान्याच्या साठवणुकीत सर्वांत कमी नुकसान गहू आणि तांदळाचे होते. सर्वाधिक नासाडी फळे आणि भाजीपाल्यांची होते. यात काही फळे जसे पेरूचे सर्वाधिक नुकसान होते. कारण त्याचे सेवन पक्ष्यांकडून केले जाते. याप्रमाणे टोमॅटो देखील खूप वाया जातो.

अन्नपदार्थांची नासाडी ही दोन मार्गांनी होते. एक म्हणजे ताटात टाकून दिले जाणारे अन्नपदार्थ आणि दुसरे म्हणजे पुरवठा साखळीत होणारी नासाडी. ते रोखण्यासाठी देखील प्रयत्न हवेत. तिसरी गोष्ट म्हणजे प्रक्रियेच्या काळात पदार्थ वाया जात असल्याने शिल्लक राहण्याचे प्रमाणही वाढते. ज्या पॅकेटमध्ये हे पदार्थ सीलबंद करून विक्रीसाठी ठेवले जातात, ते देखील कालांतराने वाया जातात आणि दुर्दैवाने याकडे लक्ष दिले जात नाही. या गोष्टी रोखण्यासाठी आतापर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. संयुक्त राष्ट्र अन्न नासाडीबाबत अगदी वेळेवर इशारा देत आले आहे. त्याकडे आपण गांभीर्याने पाहणार कधी? प्रामुख्याने पोषण आहार, अन्न सुरक्षा आणि हवामानबदल यावरून धोरणात्मक बदल करायला हवेत.

-सूर्यकांत पाठक,
कार्याध्यक्ष, राष्ट्रीय ग्राहक पंचायत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR