34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषआनंदाची गुढी

आनंदाची गुढी

आपण सर्व भारतवासी आपल्याकडील सणांचा पुरेपूर आनंद घेत असतो. हर्ष-उल्हास आनंद साजरा करणे एवढ्यापुरते त्यांचे महत्त्व मर्यादित नसून प्रत्येक सणाला त्या-त्या सणांचे एक वैशिष्ट्य असून शास्त्रीय बैठकही आहे. काम्य कर्मांनी मनुष्याच्या शक्तीचा क्षय होत असतो. सणावारी म्हणजेच पवित्र तिथींना पूजा-अर्चा, जप-तप, त्याग-उपवास, स्नान-शुद्धी, व्रते यामुळे क्षीण भक्तीला पुन:प्रेरणा नवसंजीवन प्राप्त होते. नव्या शक्तींचा संचय होतो. आचार-विचारांना उत्तम गती मिळते. सुसंस्काराचे बीजारोपण होते. हे सर्व आपल्या जीवनसमृद्धीसाठी आवश्यक असते. म्हणूनच आपण भारतीय इतके सारे उत्सव सण-समारंभ साजरे करतो.

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा! नव्या वर्षाचा पहिला दिवस. सर्व उत्सवांचे प्रवेशद्वार. हिंदूंच्या साडेतीन मुहुर्तापैकी हा एक मुहुर्त. या तिथीला युगादी तिथी असेही म्हणतात. भारतात वर्षगणना करण्याचे ब्रह्मा पित्यु, दैव, प्रज्ञापत्य, गौरव, सौर, सावन चांद्र आणि नक्षत्र असे नऊ प्रकार आहेत. यातील सौर गणना प्रचलित असून त्यानुसार चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला कालगणना सुरू होते. वर्ष प्रतिपदेला तैलाभ्यंगस्नान करून कळकाच्या कणीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे अथवा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडूलिंबाची कोवळी फांदी, फुलांची माळ व गाठी बांधतात यालाच गुढी म्हणतात. वर्ष प्रतिपदेलाही गुढी उभारतात म्हणूनच त्या दिवसाला गुढीपाडवा असे म्हणतात. उभारलेल्या गुढीची गंध, अक्षता, पुष्प, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी मनोभावे पूजा केली जाते. कडूनिंब, गूळ आणि धने यांचा प्रसाद सेवन केला जातो. गुढी हे विजयाचे प्रतीक मानले जाते. प्रभू श्रीरामचंद्रांनी वालीच्या जुलमातून प्रजेची मुक्तता केली म्हणून सर्व प्रजेने आपापल्या विजयाची पताका म्हणजेच गुढी उभारली.

ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली व कालगणनाही सुरू केली म्हणूनच चैत्रशुद्ध प्रतिपदेला इतर धार्मिक विधींबरोबर ब्रह्मदेवाच्या पूजेलाही अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यानंतर पिवळे, पळे, घटिका, प्रहर इत्यादी काल विभागांची तसेच दक्ष कन्यांची व विष्णूची पूजा करतात. वर्ष -प्रतिपदेला जो वार येईल त्या वाराच्या अधिपतीचीही पूजा करा, अशी शास्त्राज्ञा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून शालीवाहन शकाचा प्रारंभ झाला. शालीवाहन नावाच्या कुंभाराने मातीचे सैन्य तयार केले व त्यावर पाणी शिंपडले. अवघे सैन्य सजीव झाले! याच सैन्याच्या मदतीने शालीवाहनाने शत्रूचा पराभव केला. विजयाची आठवण म्हणून त्या दिवसापासून शालीवाहन शकाचा प्रारंभ करण्यात आला. अशी ही चैत्र शुद्ध प्रतीपदा म्हणजे पाडवा! नवीन वर्षात येणा-या सर्व सणांचे प्रवेशद्वार गुढीपाडवा. तुम्हा आम्हा सर्वांसाठी नवचैतन्य, नवी उमेद, नवाउत्साह घेऊन आलेला आहे.

-प्र. ल. श्रीवास्तव, देवर्जन

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR