38.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयमहाशक्तीचा खेळ!

महाशक्तीचा खेळ!

महाराष्ट्रात जागावाटपाची रणधुमाळी अजून संपलेली नाही. एका-एका जागेसाठी महायुतीत चर्चेच्या फै-या झडत आहेत. महायुतीत ब-याच जागांवर खल सुरू आहे. खरी रस्सीखेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सुरू आहे. आतापर्यंत ब-याच जागांचा तिढा संपलेला आहे, असे सांगण्यात येत असले तरी काही मोजक्या जागांवर अजूनही हमरीतुमरी सुरू आहे. कल्याणची जागा शिंदे गटाला सोडण्यात आली आहे मात्र, ठाण्यावर भाजपचा दावा कायम आहे. नाशिकच्या जागेवर भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीने दावा केला आहे. जागावाटपात भाजपने दांडगाई केल्याने शिंदे गटाचे मंत्री, आमदार संतापले आहेत. कुठल्या तरी सर्वेक्षणाचा आधार दाखवत शिवसेनेला हक्काचे मतदारसंघ नाकारण्यात आले. उमेदवार निवडीत हस्तक्षेप करून उमेदवार बदलण्यास भाग पाडण्यात आले. असेच प्रकार होत राहिले,

दादागिरी वाढत राहिली तर विधानसभा निवडणुकीसाठी आपले भविष्य अंधारमय आहे, अशी भीती शिंदे गटाला वाटू लागली आहे. आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत शिंदे गटाचे आमदार चिंताग्रस्त झाले आहेत. भाजपने कितीही दबाव आणला तरी आपण ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात भाजपच्या दबावाला बळी न पडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. आपण सर्वांनी उठाव केल्यामुळेच भाजपला सत्तेत सहभागी होता आले याची जाणीव भाजपला करून द्यावी, असा विचार बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीत आघाडी धर्माची जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला. कोणत्या ना कोणत्या कारणाने सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलेले राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळामध्ये मात्र आपला आघाडी धर्म विसरतात.

केंद्रीय किंवा राज्य स्तरावर जेव्हा कोणत्या एका पक्षाला स्वबळावर सत्ता मिळविणे शक्य होत नाही तेव्हा मित्र पक्षांची जमवाजमव करून आघाडीचे राजकारण केले जाते. सत्तेत सहभागी होताना सर्वांनाच छान वाटत असले तरी ऐन निवडणुकीच्या कालावधीत मात्र या आघाडी धर्माची कसोटी पाहिली जाते. केवळ सत्तेवर असलेल्या आघाडीमध्येच आघाडी धर्माची आव्हाने निर्माण होतात असे नाही तर विरोधकांच्या आघाड्यांमध्येसुद्धा अशा प्रकारचा अंतर्विरोध दिसून येतो. भाजपच्या दबावामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला हिंगोलीत उमेदवार बदलावा लागला. वाशिम-यवतमाळमधून ५ वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली. परभणी, उस्मानाबादच्या जागा सोडाव्या लागल्या. रायगड, शिरूर हे मतदारसंघ हक्काचे असतानाही मित्र पक्षाला सोडावे लागले. ठाणे, संभाजीनगर जागांसाठी संघर्ष करावा लागत आहे त्यामुळे शिंदे गटात नाराजी आहे.

महाविकास आघाडीतही सांगली लोकसभा मतदारसंघावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांच्यात जुंपली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. सत्ताधारी महायुती असो की विरोधी महाविकास आघाडी त्यांच्या सर्व उमेदवारांची नावे निश्चित झालेली नाहीत. सर्वसाधारणपणे जेव्हा निवडणुकीच्या निमित्ताने असे विविध पक्ष एकत्र येतात तेव्हा संयुक्तपणे जागा वाटप केले जाते. त्या त्या ठिकाणी उमेदवार निश्चित केले जातात आणि संयुक्तपणे त्याची घोषणा करतात. या वेळी प्रथमच असे घडले की, प्रत्येक आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे आपल्या जागांची घोषणा करीत राहिला. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सांगली मतदारसंघातून पहिलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. प्रत्यक्षात हा मतदारसंघ काँग्रेससाठी राखीव आहे. भाजपने अजित पवार गट असो की एकनाथ शिंदे गट, त्यांच्या जागा कमी करून कमळ चिन्हावर जास्तीत जास्त जागा लढवल्या जाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले त्यामुळे असंतोष निर्माण झाला.

या निवडणुकीत कोणत्याही स्थितीत ४०० आकडा पार करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे; परंतु त्यामुळे आपल्या सहकारी मित्र पक्षावर अन्याय होत आहे याकडे मात्र भाजपचे दुर्लक्ष होत आहे. एकनाथ शिंदे गटाने बंडाचे निशाण फडकावत सुरत-गुवाहटीच्या दिशेने कूच केले तेव्हा त्यांना आपल्या पाठीशी ‘महाशक्ती’ असल्याचा साक्षात्कार घडला. आपल्या मागे महाशक्ती असल्याने चिंता करण्याचे कारण नाही, असे बेईमान आमदारांना सांगण्यात येत होते; परंतु पुढे ही महाशक्ती काय खेळ करणार आहे ते शिंदे गटाच्या लक्षात आले नाही. या महाशक्तीने शिवसेना व धनुष्य-बाणाचे अस्तित्वच नष्ट केले आहे. आम्हीच खरी शिवसेना, असा बोभाटा करणा-या शिंदे गटाचे शेपूट अखेर भाजपने गिळले आहे. शिंदे गटाकडे धड नव्हतेच शेपूटच वळवळ करीत होते ते शेपूटही गिळंकृत झाले. भाजप म्हणजे नक्की काय आहे ते आता शिंदे गटाला कळले असेल. निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांनी लबाडी करून शिवसेना व धनुष्य-बाण शिंदे गटाला दिला. आता चोरावर मोर होण्याचे काम भाजप करीत आहे. मूळ शिवसेना अस्तित्वात होती तेव्हा ती राज्यातील २३ लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवत असे. आज शिंदे गटाला डझनभर जागा मिळवण्यातही अपयश आले आहे. महाशक्तीने एका झटक्यात शिंदे गटाच्या चार खासदारांना नाकारले आणि नंतर धनुष्य-बाणही गायब केले. महाशक्ती ख-याचे खोटे व खोट्याचे खरे करू शकते.

नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर कोर्टाने प्रश्नचिन्ह निर्माण केले; पण राणांनी महाशक्तीची आराधना करताच व भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरले. हा चमत्कारच म्हणावा लागेल. काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना मात्र जात प्रमाणपत्राबाबत दिलासा मिळूनही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरल्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, आमदार एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपण स्वगृही परतणार आहोत, असे ते म्हणाले. खडसे आणि गिरीश महाजन यांचे जमत नाही. खडसे यांच्या प्रवेशासंबंधी त्यांना विचारण्यात आले तेव्हा महाजन म्हणाले, खडसेंकडे गावातील ग्रामपंचायतही नाही. त्यांच्या पत्नीचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत मुलगीही पराभूत झाली, बँकेची सत्ताही गेली. त्यांच्याकडे काय राहिले आहे? जो दिवा विझलेला आहे त्याच्याबद्दल एवढं का विचारता? महाजनांचा सवाल रास्त असला तरी महाशक्तीच्या प्रभावामुळेच खडसेंना स्वगृही परतावे लागत आहे. हा सारा महाशक्तीचा महिमा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR