40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरउत्तर तालुक्यातील दोन हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत

उत्तर तालुक्यातील दोन हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत

उत्तर सोलापूर : किती वेळा बँकेत जायचे? किती हेलपाटे तहसील कार्यालयात मारल्यावर पैसे जमा होणार, असा प्रश्न उत्तर तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. अतिवृष्टी, संततधार व अवेळी पावसाने पीक नुकसान होऊन आता तिसरा पावसाळा आला. मात्र, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. ही संख्या तब्बल दोन हजार ४७ आहे.

तशी मागील पाच वर्षे शेतकऱ्यांसाठी खडतर ठरली आहेत. अगोदर चार वर्षे अतिवृष्टी, संततधार व अवकाळीने पिके आडवी झाली, तर मागील वर्षी पीक वाढीसाठीही पुरेसा पाऊस पडला नाही. २०२३ चा पावसाळा फारच गंमतशीर होता.

जुलै महिन्यात अतिवृष्टी, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात संततधार शिवाय एप्रिल व नोव्हेंबर महिन्यात अवकाळीने गाठल्याने पिकांचे संपूर्ण नुकसान झाले होते. यामुळे राज्य शासनाने पीकनुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितले. २०२३ मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संततधारेने झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम मागील वर्षीचा पावसाळा तर गेलाच, शिवाय या वर्षीचा पावसाळा दोन महिन्यांवर आला तरी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.

दोन वर्षे झाले तर शेतकरी तहसील कार्यालय, बँक असे हेलपाटे मारत आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी व गावच्या नेत्यांकडे हेलपाटे मारून वैताग आल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.उत्तर तालुक्यातील २४३ शेतकरी आजही आर्थिक मातीपासून वंचित आहेत. त्यामध्ये नान्नजचे २४३ शेतकरी आहेत. बीबीदारफळचे २११, कळमण १६९, रानमसले १४५, कौठाळी १३६, पडसाळी ११४, वडाळा ६४, हिरज ६०, साखरेवाडी ५३, पाकणी ५१, मार्डी ४५, कोंडी ४४, भागाईवाडी ४३, हगलूर ४२, कसबे सोलापूर ४०, गावडीदारफळ ३७, बाणेगाव, इंचगाव, कवठे प्रत्येकी ३०, तिर्हे २८, पाथरी, सेवालालनगर प्रत्येकी २६ व इतर गावांत यापेक्षा कमी लाभार्थी शेतकरी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR