32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरकरकंब व तुळशीलगतचे नैसर्गिक तलावात पाणी सोडण्याची गरज

करकंब व तुळशीलगतचे नैसर्गिक तलावात पाणी सोडण्याची गरज

पंढरपूर: पंढरपूर तालुक्यातील करकंब व तुळशी (ता. माढा) गावालगतच्या नैसर्गिक तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न दुष्काळ व निवडणुकीत गंभीर झाल्याने राजकीय नेते मंडळींना या प्रश्नी तोडगा काढावा लागेल. करकंब गावातील पाणी प्रश्नासह करकंब व तुळशी गावातली एक हजार एकराचा परिसर हिरवागार होईल का ? याकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील एकूण ४२ गावामध्ये करकंब हे एक गाव आहे. गावाच्या बाहेरून पूर्वेस मागील पिढीतील ग्रामस्थांनी नैसर्गिक अशी साठवण तलावाची जागा विकसित केली आहे. या तलावाला एक नैसर्गिक ओढ्याचा एक प्रवाह येतो. भराव घालून तलाव सर्वबाजूंनी बंद केलेला आहे. जास्तीचे पाणी वाहून जाण्यासाठी सांडवा देखील तयार केलेला आहे. आता करकंबच्या पश्चिमेकडील भागात कालव्याने शेतीला सिंचनाचे पाणी मिळते, पण करकंबचा हा पूर्व भाग कायम कोरडा राहिला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी बागायती पिकांपासून वंचित आहे.

करकंब गावालगतचा तलाव नैसर्गिकदृष्ट्या उत्तम आहे. मात्र तलावाला येणा-या ओड्यावर पुढील भागात बंडीगंची कामे झाली असल्याने आता ओढ्याचे पाणी वाहत नाही. काही वर्षापूर्वी या तलावातील गाळ काढून शेतक-यांनी शेतात टाकला. त्यामुळे तलावाची खोली वाढली. या तलावात मध्यभागी गाळात एक प्राचीन मंदिर असल्याचे जुनी मंडळी सांगतात. एकूणच गावातील भूजल पातळी वाढण्यासाठी हा तलाव उपयुक्त असा आहे. इतका चांगला तलाव असल्याने येथील ग्रामस्थांनी या तलावात पाच कि. मी. अंतरावरील जलस्त्रोतातून पाणी आणून सोडावे. त्यामुळे या भागातील कोरडवाहू शेती बागायती होऊ शकेल अशी भूमिका शेतक-यांनी घेतली. शेतक-यांनी स्वखर्चाने अभियंत्याकडून तलाव वापरात आणण्यासाठी तांत्रिक सर्वे करून त्याचा प्रस्ताव शासनाला दिला.

याच पद्धतीने नजीकच्या तुळशी (ता. माढा) गावाचा एक नैसर्गिक तलाव आहे. या नैसर्गिक तलावाला सांडवा बांधलेला आहे. योग्य पद्धतीने भराव घातलेला आहे. हा तलाव देखील तुळशी व नजीकच्या गावातील गावशिवारात सिंचन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

याही तलावाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या दोन्ही तलावात पाणी आणण्यासाठी अत्यंत कमी निधी लागणार आहे. मात्र या दोन्ही तलावामुळे एक हजार एकरांपर्यंत शेती ओलीताखाली येऊ शकते असे शेतक-याचे म्हणणे आहे.
यावर्षी दुष्काळाच्या झळांनी त्रस्त झालेले शेतकरी या दोन तलावाच्या पाण्यासाठी निवडणुकीत जाब विचारणार हे मात्र निश्चित झाले आहे. पाण्यात आग लागणे ही गोष्ट चर्चेत आली तरी पाणी नसलेल्या कोरड्या तलावात निवडणुकीत आग लागेल असे मानले जाते.या शेतक-यांनी आमदार बबनराव शिंदे यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली. आपण जर आशिया खंडातील मोठा बोगदा पाडून सिंचन देऊ शकतो, तर या दोन तलावात पाणी सोडून पाणी का देऊ शकत नाही असे शेतक-यांचे म्हणणे आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR