38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूर अनुकंपा तत्त्वावरील  कर्मचाऱ्यांच्या कागदपत्र पडताळणीत आढळल्या त्रुटी

 अनुकंपा तत्त्वावरील  कर्मचाऱ्यांच्या कागदपत्र पडताळणीत आढळल्या त्रुटी

सोलापूर :
परिविक्षाधीन कालावधी संपल्याने कागदपत्र पडताळणीत विविध त्रुटी आढळल्याने महापालिकेतील ४ कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. याप्रकरणी त्यांना सेवेत सामावून घेताना कागदपत्रे तपासणाऱ्या त्यावेळेच्या तीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील महापालिका आयुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत.

या सर्व कर्मचाऱ्यांना महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर २०१४ मध्ये अर्ज केल्यानंतर सेवेत सामावून घेण्यात आले होते. या सर्वांचे परिविक्षाधीन कालावधी संपल्याने महापालिका आयुक्तांनी त्यांची कागदपत्रे व इतर बाबी तपासण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले होते.

या निर्देशानंतर विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची आणि इतर बाबी संदर्भातील सविस्तर माहिती तपासली.अनुकंपा तत्त्वाखाली महापालिकेच्या आस्थापनेवर सेवेत सामावून घेतलेल्या विविध विभागातील चार कर्मचाऱ्यांचे परिविक्षाधीन कालावधी संपल्याने कागदपत्रे पडताळणी करताना त्यांच्या विविध बाबींच्या त्रुटी आढळून आल्याने त्यांच्या नोकरीवरील कारवाईचे गंडांतर आले आहे. तसेच त्यांनासेवेत सामावून घेताना कागदपत्रे तपासणाऱ्या त्यावेळेच्या तीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील महापालिका आयुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

त्रुटी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये महापालिका संगणक विभागातील संगणक ऑपरेटर दर्शना काटेवाल, नगर अभियंता कार्यालयातील शिपाई अक्षय अलकुंटे, उद्यान विभागातील रखवालदार नंदकुमार कोरे आणि आरोग्य विभागातील लिपिक रघू मंदोलू अशा चौघांचा समावेश आहे. महापालिका प्रशासनाने त्यांच्या या त्रुटीसंदर्भात त्यांना नोटिसा दिल्या असून सामान्य प्रशासन विभागाकडे त्यांच्या नोटिसांचे उत्तर प्राप्त झाले आहे. त्यांच्या या उत्तरावरून महापालिका आयुक्त त्यांच्या नोकरीसंदर्भात पुढील कोणती कार्यवाही करायची याचा निर्णय घेणार असून याप्रमाणे प्रशासनाच्यावतीने त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, यामध्ये अनुकंपा प्रकरणात कर्मचारी दर्शना काटेवाल आणि अक्षय अलकुंटे यांच्या संदर्भातील २००१ नंतर शासन नियमापेक्षा अधिक अपत्य असल्याचे आढळून आले होते. तर कर्मचारी नंदकुमार कोरे यांच्या कागदपत्रांमध्ये वारस पत्र नाही तरीही कामास घेण्यात आल्याचे आणि कर्मचारी रघू मंदोलू यांच्या संदर्भात १९७९-८० मध्ये आजोबा कामास होते पण अनुकंपा तत्त्वावर नातवाला घेतल्याचे त्रुटीमध्ये अधिकाऱ्यांना आढळून आले. कागदपत्रे पडताळणी या चौघांसंदर्भात हे प्रकार त्रुटी म्हणून आढळून आल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. यावरून त्या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. या नोटिसांचे उत्तर त्यांनी प्रशासनाकडे सादर केले आहेत. आता हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी पुन्हा महापालिका आयुक्तांसमोर सामान्य प्रशासन विभागाने सादर केले आहेत.या प्रकरणात कागदपत्रे तपासणाऱ्या त्या कालावधीतील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत.

यानुसार त्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून त्याचे उत्तर हे तिन्ही अधिकारी देणार आहेत. त्या वेळेचे संबंधित विभागातील लिपिक डोमल यांनी एक तर नागमोती यांनी तीन जणांची प्रकरणे तपासली होती. तर कार्यालयीन अधीक्षक म्हणून त्या वेळेचे अधिकारी गाडेकर यांचा समावेश आहे. यापुढे ही प्रकरणे सहायक आयुक्त आणि आयुक्तांकडेही जाऊन अंतिम निर्णय घेण्यात आला होता.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR