38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरहद्दवाढ भागाच्या सिटी सर्व्हेचे काम ठप्प

हद्दवाढ भागाच्या सिटी सर्व्हेचे काम ठप्प

प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम थंडावले

सोलापूर : शहरात समाविष्ट झालेल्या १४ गावच्या नगर भूमापनाचे काम पुन्हा ठप्प झाले आहे. हे काम पूर्ण करून हद्दवाढ भागातील मिळकतदारांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन, महापालिका आणि भूमी अभिलेख कार्यालयाने केले होते. या कामाला ब्रेक लागला आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी मुंबईत बसलेल्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवीत आहेत.

महापालिकेची हद्दवाढ करताना शहराच्या आजूबाजूची १४ गावे शहरात समाविष्ट करण्यात आली. या गावांचे नगर भूमापन झाले नाही. या क्षेत्रातील भूखंडाची हद्द व क्षेत्रफळ निश्चित झाले नाहीत. शहरात प्रॉपर्टी कार्डच्या आधारे जागांचे खरेदी-विक्री व्यवहार होतात.

महापालिका, भूमी अभिलेख, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आणि आमदार, खासदारांनी यात लक्ष घालणे आवश्यक आहे. केवळ या कामाकडे गांभीयनि पाहिले जात नसल्यानेच काम ठप्प झाल्याचे बिल्डर मंडळींकडून सांगण्यात येते.

हद्दवाढ भागात सातबारा उताऱ्यांच्या आधारे व्यवहार केले जायचे. हे सातबारा उतारे आठ वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अचानक रद्द केले. सध्या सात बारा उताऱ्यांशिवाय अनेक व्यवहार सुरू आहेत. दरम्यान, महसूल विभागाने २५ मार्च २०२२ रोजी हद्दवाढ भागाचे भूमापन करण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांनी एका पथकाची नियुक्ती केली. या पथकाने नेहरू नगर भागाचा सर्व्हे केला. त्यानंतर काम ठप्प झाले आहे.

हद्दवाढ भागात एकच जागा, फ्लॅट दोघांना, तिघांना विकण्याचे प्रकार सुरू आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रॉपर्टी कार्डची आवश्यकता आहे. प्रॉपर्टी कार्ड नसल्याने अनेक नागरिकांना गृहकर्ज काढता येत नाही. आपला खरेदी- विक्री व्यवहार कायदेशीर करून घेता येत नाही. हा प्रकार थांबविण्यासाठी प्रॉपर्टी कार्डचे काम तत्काळ सुरू होणे आवश्यक आहे.नेहरूनगर भागाचा सर्व्हे पूर्ण करून अहवाल सिटी सर्व्हे ऑफ इंडियाला पाठविला होता. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अहवाल आल्यानंतरच पुढील काम सुरू होईल.असे भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन सावंत यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR