35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरआढीवमध्ये भीषण पाणीटंचाई,विहिरींनी गाठला तळ

आढीवमध्ये भीषण पाणीटंचाई,विहिरींनी गाठला तळ

पंढरपूर : आढीव (ता. पंढरपूर) येथे पिण्याच्या पाण्याची यंदा प्रथमच भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाच्या यात्रा काळातच गावावर पाणीटंचाईचे संकट उभे राहिल्यामुळे ग्रामस्थ चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान, गावाला तीन टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे, ज्याची आतापर्यंत कधी गरजच भासली नव्हती.

पंढरपूरहून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या आढीव गावात गाव विहिरी व विंधन विहिरींमुळे कधीच पाणीटंचाई जाणवली नव्हती. यंदा मात्र पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यातच गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाच्या यात्रेची लगबग सुरू झाली आहे. ही यात्रा तीन दिवस चालते. या यात्रेला गावात मित्र परिवार व नातेवाइकांची मोठीगर्दी होत असते. तब्बल तीन दिवस चालणाऱ्या यात्रा काळात पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. परंतु, गेल्या काही दिवसांपासून गावात अचानक पाण्याची टंचाई सुरू झाली आहे.

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे या विहिरीवरून गावाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, म्हणून ग्रामपंचायत व काही ग्रामस्थांच्या मदतीने सध्या गावाला तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ही सोय करूनही लोकांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे गल्लीत पाण्यावरून भांडण-तंटे सुरू झाली आहेत.

असे असले तरी, श्री काळभैरवनाथाच्या यात्रा काळात लोकांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत म्हणून ग्रामपंचायतीने काही बोअर अधिग्रहण केले आहेत. सुमारे तीन हजार १७८ लोकसंख्येच्या गावात सुमारे ७०० कुटुंबे राहतात. या लोकांना आता पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत.
आम्ही ग्रामपंचायत व काही ग्रामस्थांच्या मदतीने सध्या तीन टैंकरने गावाला पाण्याचा पुरवठा करत आहोत. गावालगत असलेल्या काही शेतकर्‍यांचे बोअर अधिग्रहण केले आहेत. असे ग्रामसेविका एस. बी. सासणे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR