29.3 C
Latur
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रकारवाई करण्यापूर्वी विचार करावा

कारवाई करण्यापूर्वी विचार करावा

नियम तोडला नाही, विशाल पाटलांचा काँग्रेसला इशारा

सांगली : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील जागेवरुन जोरदार रस्सीखेच सुरू होती. पण, अखेर ही जागा महाविकास आघाडीने ठाकरे गटाला सोडली. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, आता काँग्रेसच्या विशाल पाटील यांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. पदाधिका-यांशी चर्चा करून विशाल पाटील यांच्याबाबत अहवाल तयार केल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. या अहवालावर दिल्लीत कारवाईचा निर्णय होणार असल्याची माहिती पटोलेंनी दिली. दरम्यान, आता काँग्रेसच्या कारवाईवर विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसवर अन्याय झाला आहे, म्हणून कार्यकर्ते चिडले आहेत. मी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन करतो. मी पक्षाच्या विचाराच्या विरोधात वाागणूक केलेली नाही. मी पक्षाचा कुठलाही नियम तोडलेला नाही. मला लेखी कोणताही आदेश आला नव्हता. काँग्रेसच्या अडचणीच्या काळात आमच्या घराण्याने काम केले आहे. वसंतदादांच्या नेतृत्वात जास्त खासदार निवडून आले आहेत. राज्यात एकहाती सत्ताही वसंतदादांनी आणली होती. अशा कोणतीही कारवाई करायची असेल त्यावर सही करणा-याने अगोदर विचार करावा, की सही करणा-याचे कॉन्ट्रीब्युशन हे आमच्या घरापेक्षा जास्त आहे का हे पाहावे आणि नंतर सही करावी, असा इशाराही विशाल पाटील यांनी दिला.

जिल्ह्यातील अनेक लोक नाराज आहेत. जतमध्येही असंच आहे. मागील १० वर्षात भाजपाने कोणतीही कामं केलेली नाहीत. ग्रामीण भागातून शेतक-यांचा रोष आहे. या निवडणुकीत संजयकाका हे भाजपाचे उमेदवार असल्यामुळे त्यांना मते पडतात, ते वैयक्तिक लढले तर त्यांना मते पडणार नाहीत याबाबत मी त्यांना आवाहनही केले आहे असेही विशाल पाटील म्हणाले. आमच्या पक्षावर हा अन्याय झाला आहे. आम्ही विश्वजीत कदम यांनाच नेता मानतो. निवडणूक झाल्यानंतर आम्ही त्यांच्या नेतृत्वातच काम करणार आहे असेही विशाल पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR