28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांसाठी विनोद पाटलांच्या घरून जेवणाचा डबा

मुख्यमंत्र्यांसाठी विनोद पाटलांच्या घरून जेवणाचा डबा

छ. संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल बुलडाणा येथील सभेला जाण्यासाठी ते संभाजीनगर मार्गे गेले. दरम्यान, मुंबईला परत जातांना मराठा आरक्षण याचिकाकर्ते व छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असलेले विनोद पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची चर्चा होती. परंतु बुलडाण्याहून परतण्यास मुख्यमंत्री शिंदे यांना रात्रीचे बारा वाजले. त्यामुळे विनोद पाटील हे स्वत: चिकलठाणा विमानतळावर जाऊन त्यांना भेटले. पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे त्यांनी स्वागत केले. घाईत दौरा झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे जेवण राहिले होते, त्यांच्यासाठी विनोद पाटील यांच्या घरून खास डबा मागवण्यात आला होता.

युवासेनेचे कार्यकर्ते तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम पाहणारे अमर लोखंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना जेवणाचा डबा पाठवण्यात आला होता. डब्यामध्ये आलू मटार, पनीर, मेथीची भाजी, चपाती-भाकरी आणि गुलकंदचा हलवा असे पदार्थ होते. मुख्यमंर्त्यांच्यावतीने त्यांच्या सहका-यांनी हा डबा स्वीकारला. त्यानंतर विनोद पाटील आणि त्यांच्या कार्यकर्ते विमानतळावरून परतले. अगदी काही मिनिटांची ही भेट होती. परंतु या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे बोलले जाते.
लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये काही मतदारसंघाबद्दल वाद आहेत. चर्चेच्या अनेक फे-या झाल्या, बैठका झाल्या पण त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही.

शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असणा-यांमध्ये विनोद पाटील यांचे नाव आघाडीवर होते. शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास आपण इच्छूक आहोत, उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवणार, अशी घोषणा यापुर्वीच विनोद पाटील यांनी केली होती.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरेयांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे ठामपणे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर काल विनोद पाटील यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेली भेट विशेष मानली जात आहे. परंतु वाढदिवसच्या शुभेच्छा शिवाय पाटील यांना मुख्यमंर्त्यांनी कुठलेही रिटर्न गिफ्ट किंवा शब्द दिला नसल्याचे बोलले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR