33.5 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रचौरंगी लढतीत कोणाची बाजी?

चौरंगी लढतीत कोणाची बाजी?

राजू शेट्टी की सत्यजित की धैर्यशील

कोल्हापूर : हातकणंगले हा कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४ आणि सांगली जिल्ह्यातील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. या मतदारसंघात शाहुवाडी इचलकरंजी शिरोळ हातकणंगले हे कोल्हापूर जिल्ह्यातील तर वाळवा आणि शिराळा हे सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहेत हातकणंगले लोकसभा म्हणजेच पूर्वीचा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा कृष्णा पंचगंगेचा ऊसपट्टा या मतदारसंघाचा प्रमुख भाग.अनेक वर्ष काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादीने या मतदारसंघावर राज्य केलं. विशेषत: बाळासाहेब माने, त्यांची सून निवेदिता आणि आता त्यांचे नातू धैर्यशील माने. या माने घराण्याने हातकणंगले लोकसभा वेळोवेळी जिंकली.

हातकणंगले मतदारसंघ हा तसा काँग्रेसच्या विचारधारेचा म्हणता येईल. म्हणजे १९७७ ते १९९१ अशा पाच टर्म काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांनी इथूनच बाजी मारली होती. त्यानंतर काँग्रेसकडून कल्लाप्पा आवाडे यांनी दोनदा विजय मिळवला.पुढे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा बाळासाहेब माने यांची सून निवेदिता माने दोनदा खासदार झाल्या. या ऊसपट्ट्याच्या मतदारसंघाला राष्ट्रीय ओळख मात्र मिळाली ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी मिळवलेल्या अनपेक्षित विजयामुळे कोणताही आर्थिक वा राजकीय पाठिंबा नसताना साखर सम्राटांच्या या बालेकिल्ल्याला राजू शेट्टी यांनी दोन वेळा हादरा दिला आणि शेतक-यांची ताकद संसदेत पोहचवली. मात्र याच राजू शेट्टी यांचा झंझावात गेल्या निवडणुकीत निष्प्रभ ठरला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचा महायुतीने पराभव केला होता या मतदारसंघात जैन समाजाचे सुमारे दीड लाख मतदान आहे. त्या पाठिंब्यासह राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतक-यांची मते मोठ्या प्रमाणावर मिळवत आपले बस्तान बसवले होते. प्रामाणिक प्रतिमा असलेल्या शेट्टींना सामान्य शेतकरी वर्गातून मिळणारे पाठबळ कायम होते. याला खिंडार पाडण्यासाठी त्या काळात शेट्टींविरोधात आक्रमक जातीय प्रचार सुरू झाला. शिवाय स्वत: राजू शेट्टी यांनी ब्राह्मणवर्गाविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य त्यांनाच भोवलं,असं म्हटलं जातं.थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडून राष्ट्रीय पातळीवर राजू शेट्टी यांनी शेतक-यांचा नेता अशी ओळख मिळवली होती. त्यामुळं त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपनं सर्व ताकद माने यांच्या पाठिशी उभी केली. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली. त्याचा फटका थेट सरकारलादेखील बसला होता.

त्याविरोधात धैर्यशील माने हे शेतकरी, तरुण, व्यापारी आणि उद्योजक यांचे मुद्दे घेऊन या ंिरगणात उतरले. राजू शेट्टी यांना इचलकरंजीचा पाणी प्रश्न व वस्त्र उद्योगाचा विकास या मुद्यावर मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न केल्याने माने यांना शहरात लोकप्रियता मिळत गेली. शिवाय सेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी प्रचाराची राळ उठवली. त्याला भाजपचे पाठबळ आणि मराठा मोर्चाची पार्श्वभूमी लाभल्याने धैर्यशील माने यांनी मैदान मारले होते. २०२४ मधे मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी आपली ‘एकला चलो रे’ ची भूमिका कायमठेवल्यामुळे अखेर शिवसेनेने आपला स्वतंत्र उमेदवार शाहूवाडी पन्हाळा तालुक्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी जाहीर केली शेट्टी यांनी आपला निर्णय देण्यास विलंब केल्यामुळे वंचित आघाडीकडूनही माजी जिल्हा परिषद सदस्य डी. सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे आता या मतदारसंघात चौरंगी लढत निश्चित झालीमहायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी केलेल्यागद्दारीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी राजू शेट्टी यांना पहिली पसंती दिली होती. त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण त्यांनी फक्त पाठिंबा द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त केली. अखेर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना महाविकास आघाडीचा घटक पक्षात यावे. आणि शिवसेनेचे मशाल चिन्ह घ्यावेच असा आग्रह धरला. यातून तडजोडीच्या वाटाघाटी फिसकटल्या आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा स्वतंत्र उमेदवार म्हणून त्यांनी सत्यजित पाटील त्यांना उमेदवारी दिलीशिवसेना आणि वंचित आघाडीच्या उमेदवारीचा फटका राजू शेट्टी यांना बसण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR