33.5 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeसोलापूरमाढा मतदारसंघात अटीतटीचा सामना

माढा मतदारसंघात अटीतटीचा सामना

माढाच्या निवडणुकीची भाजपकडून गंभीर दखल

सोलापूर : रणजीत जोशी
माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली असून रणजीतसिंह निंबाळकर यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा मोठा डाव खेळला असून जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण करण्याची खेळी या लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून मोहिते पाटील खेळत आहेत. तर जिल्ह्यात पुन्हा अकलूजचा एकछत्री अंमल सुरू होऊ नये म्हणून मोहिते पाटील विरोधक भाजपच्या झेंड्याखाली एकवटले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील शेकापचे नेते अनिकेत देशमुख, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर शरद पवार गटाच्या प्रचारात सक्रिय झाले. यामुळे मोहिते-पाटलांचा आत्मविश्वास वाढला आहे. रोज नवे धक्के खाणा-या भाजपने माढ्याची निवडणूक आणखी गंभीरपणे घेतली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवी मोर्चेबांधणी सुरू आहे. माढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह निंबाळकर, शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे. भाजपने पुन्हा करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून मोहिते-पाटील विरोधकांची माढ्यात मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. माढा, माळशिरस, पंढरपूर, फलटण भागातील विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पवार गट, मोहिते-पाटील गट गेल्या सहा महिन्यांपासून माढ्याची तयारी करीत होता. दोघांनी करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माळशिरसचे उत्तम जानकर, सांगोल्याचे अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख, माढ्याचे धनाजी साठे, फलटणचे रघुनाथराजे ंिनबाळकर या नेत्यांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले होते. माण, फलटण भागातील नेत्यांची भूमिका प्रचार सुरू झाल्यानंतर जाहीर होईल याची दक्षता घेतली होती.

या सर्व राजकीय घडामोडींचा अंदाज भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह इतर नेत्यांना नव्हता. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही माढ्यातील स्थितीची दखल भाजपच्या नेतृत्वाने गंभीरपणे घेतली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे प्रकृतीच्या कारणांमुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसे सक्रिय नव्हते; परंतु माढा आणि सोलापूरचे वातावरण तापल्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या सहका-यांना भेटण्याचा सपाटा लावला आहे. ‘व्हिलचेअर’च्या आधारे सुरू असलेल्या गाठीभेटी चर्चेचा विषय आहे.
दुसरीकडे माढ्याचे आमदार बबन शिंदे, संजय शिंदे, सांगोल्याचे अ‍ॅड शहाजीबापू पाटील यांनी मोहिते पाटलांविरोधात आक्रमक प्रचार सुरू केला असून रणजितसिंह निंबाळकरांच्य मागे पूर्ण ताकद झोकून दीली आहे. उत्तमराव जानकर, करमाळ्याचे माजी आमदार नारायणआबा पाटील हे धनगर समाजाचे नेते मोहिते पाटलांकडे झुकल्याने धनगर समाजाचे मतदान आकृष्ट करण्याचा मोहिते पाटलांचा प्रयत्न आहे तर धनगर समाजातील ईतर नेत्यांना आपल्याकडे वळवून घेण्याचा निंबाळकरांचा प्रयत्न आहे.

फलटणच्या रामराजे निंबाळकर गटाचा कडवा विरोध रणजितसिंह निंबाळकरांना होत आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सावध झाले असून दगाफटका होऊ नये म्हणून पावले उचलली जात आहेत. मोहिते पाटलांनी बेरजेचे राजकारण सुरू केले असून धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न सुरू आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात संजय कोकाटे, संजय पाटील भीमानगरकर, शिवाजी कांबळे, भारतआबा शिंदे यांच्यासह दुस-या फळीतील नेत्यांची भूमीका महत्वाची ठरणार आहे. प्रशांत परिचारक यांच्या भूमीकेला महत्व आले असून माढा मतदारसंघात फलटण, माण परिसर तसेच माळशिरस, माढा परिसरात परिचारकांचे गावपातळीपर्यंत संपर्क आहे.याचा उपयोग मोहिते पाटलांना शह देण्यासाठी भाजप करत असून परिचारकांची भूमीका राजकीय व्यवस्थापनात महत्वाची ठरत आहे.माढ्याची जागा भाजपच्या दृष्टीने महत्वाची असून जिल्ह्यातील आगामी राजकारणात माढ्याच्या निकालाचे पडसाद उपटणार आहेत त्यामुळे भाजपनेही सावधपणे सोंगट्या फिरवण्यास सुरवात केली आहे. माढ्याची लढाई हातघाईची होत असून मैदान कोण मारणार आणी धारातीर्थी कोण पडणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR