39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीय‘जय हो’ गुलजार!

‘जय हो’ गुलजार!

भारतीय साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार समजल्या जाणा-या ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली. प्रसिद्ध उर्दू गीतकार, कवि गुलजार आणि संस्कृत अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य यांना २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. गुलजार यांना उर्दूसाठी तर जगद्गुरु रामभद्राचार्य यांना संस्कृतसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती निवड समितीने दिली. यापूर्वी २०२२ चा ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार गोव्यातील लेखक दामोदर मावजी यांना देण्यात आला होता. ज्ञानपीठ विजेत्या प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा केली. संस्कृत भाषेसाठीचा हा दुसरा तर उर्दूसाठीचा हा पाचवा पुरस्कार आहे. ११ लाख रुपये, वाग्देवीची मूर्ती आणि प्रमाणपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गुलजार यांच्या रूपाने उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. गुलजार यांचे उर्दूवरील प्रभुत्व आणि त्या भाषेचे प्रेम प्रसिद्ध आहे. ‘यह कैसा इश्क है उर्दू जबान का, मजा घुलता है लफ्जों का जबान पर’ अशा शब्दांमध्ये त्यांनी उर्दू भाषेचे सौंदर्य वर्णन केले आहे.

जगद्गुरु रामभद्राचार्य केवळ दोन महिन्यांचे असताना त्यांची दृष्टी गेली. आजोबांनी त्यांना घरीच शिकविले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत केली होती. आठव्या वर्षी संपूर्ण रामचरितमानस पाठ केले होते. दृष्टिहीनतेमुळे ते प्रचलित पद्धतीनुसार साक्षर नाहीत. मात्र मौखिक परंपरेने त्यांनी संस्कृत साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांना २२ भाषा अवगत आहेत. दृष्टिहीन रामभद्राचार्य चित्रकूट येथील तुलसी विद्यापीठाचे संस्थापक आहेत. त्यांनी शंभराहून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांचे मूळ नाव गिरीधर मिश्र. जगद्गुरु ही उपाधी त्यांना १९८८ मध्ये प्राप्त झाली. २०१५ मध्ये त्यांना केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. संस्कृत भाषा, वेद आणि पुराणांचे महान अभ्यासक, अशी त्यांची ओळख आहे. भारतीय साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय लेखकांचा सन्मान करण्यासाठी श्री साहू शांती प्रसाद जैन यांनी १९६१ मध्ये या पुरस्काराची स्थापना केली.

२२ पैकी कोणत्याही भाषेत लिखाण करणा-या देशाच्या कोणत्याही योग्य नागरिकाला हा पुरस्कार दिला जातो. विविध भाषांमधील साहित्यिक, शिक्षक, समीक्षक, बुद्धिमान वाचक, विद्यापीठे, साहित्यिक आणि भाषिक संस्थांकडून ज्ञानपीठ पुरस्काराच्या नामांकनासाठी नावे पाठविली जातात. १९६५ मध्ये १ लाख रुपये पुरस्काराची रक्कम होती. २००७ मध्ये ती ७ लाख रुपये करण्यात आली. त्यानंतर वरचेवर त्यात वाढ करण्यात आली. ज्येष्ठ कवि, गीतकार गुलजार यांची ओळख काय सांगावी? हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी ते ओळखले जातातच शिवाय उत्कृष्ट उर्दू कवि म्हणून ते ख्यातनाम आहेत. त्यांनी चित्रपट गीतांमध्येही अभिजात काव्याची पेरणी करता येते हे सिद्ध केले. त्यांना त्यांच्या कामासाठी २००२ मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, २००४ मध्ये पद्मभूषण आणि किमान पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंग कालरा. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३४ रोजी अविभक्त भारतातील झेलम जिल्ह्यातील दिना गावात झाला. आज हे गाव पाकिस्तानात आहे.

त्यांच्या वडिलांचे माखन सिंग. गुलजार यांना अभ्यासात फारसा रस नव्हता. ते बारावीच्या परीक्षेत नापास झाले होते परंतु त्यांची साहित्याची आवड कायम होती. गुलजार यांनी शायरी केली, कविता केल्या, कथानके लिहिली. फाळणीच्या काळात त्यांनी हजारो लोकांना मरताना पाहिले, उद्ध्वस्त होताना पाहिले. लहान वयात झालेल्या जखमा आयुष्यभर भरून येत नाहीत. गुलजार यांच्या मनात आजही त्या आठवणी ताज्या आहेत. म्हणूनच गुलजार लिहितात, डोळ्यांना व्हिसाची गरज नसते. स्वप्नांना सीमा नसतात. मी बंद डोळ्यांनी रोज सीमेपार जातो. ‘माचिस’ चित्रपटातून त्या वेदना अशा पद्धतीने बाहेर आल्या –
छोड आए हम वो गलियां
जहाँ तेरे पैरो के कंवल गिरा करते थे
हंसे तो दो गालों में भंवर पडा करते थे
तेरी कमर के बल पे नदी मुडा करती थी
हंसी तेरी सुन-सुनके फसल पका करती थी।
फाळणीनंतर गुलजार कुटुंब अमृतसरमध्ये आले. त्यांचे वडील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छोटे-मोठे व्यवसाय करू लागले. १९५० मध्ये भावाला मदत करण्यासाठी गुलजार मुंबईत आले. सुरुवातीला त्यांनी मोटार गॅरेजमध्ये काम केले. त्यांची कविता लिहिण्याची आवड पाहून वडील म्हणायचे, कविता आणि गोष्टी लिहून पोट भरत नाही. हा आपल्या भावाकडून कर्ज घेईल, गुरुद्वाराच्या लंगरमध्ये जाऊन भूक भागवेल! हळूहळू गुलजार यांचा चित्रपट जगताकडे कल वाढला. गुलजार गीतकार शैंलेंद्रच्या संपर्कात आले. त्यांनी बिमल रॉय यांच्या चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची प्रेरणा दिली. पुढे ते बिमल रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. १९६३ मध्ये ‘बंदिनी’ चित्रपटातील ‘मोरा गोरा अंग लैले, मोहे श्याम रंग दै दे’ हे गाणं लिहिलं. बिमल रॉय यांच्या निधनानंतर ते हृषिकेश मुखर्जी यांचे सहायक बनले. ‘आशीर्वाद’, ‘आनंद’ आणि ‘गुड्डी’ चित्रपटांनी त्यांना कमालीचे यश मिळवून दिले. गुलजार काळानुसार स्वत:ला बदलत राहिले. १८ एप्रिल १९७३ रोजी गुलजार आणि अभिनेत्री राखी यांनी प्रेमविवाह केला.

मात्र हा विवाह एकच वर्ष टिकला. त्यांना मेघना नावाची मुलगी आहे. तिनं वडिलाचे चरित्र लिहिले आहे ‘बिकॉज ही इज’. मेघना दिग्दर्शिका आहे. गुलजार यांचा हिंदी चित्रपट गीतांचा प्रवास थक्क करणारा आहे. शांत दिसणा-या गुलजार यांना वेगात गाडी चालविण्याची सवय आहे, त्यामुळे ब-याच वेळा ते लाँग ड्राईव्हला जातात. गुलजार आवडतात ते त्यांच्या गाण्यासाठी, चित्रपटांसाठी, शायरीसाठी, कवितांसाठी, कथांसाठी! २००९ मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ गाण्यासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. या गाण्यासाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. अशा या प्रतिभावंत कलावंताला म्हणू
या-‘जय हो’ गुलजार!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR