40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनरेंद्र मोदींची शक्ती कमी करणे ही देशाची गरज

नरेंद्र मोदींची शक्ती कमी करणे ही देशाची गरज

सातारा : जिल्ह्यात यशवंतराव चव्हाणांपासून अनेक कर्तृत्त्वान लोकांची फळी निर्माण झाली. त्यांच्या विचारांचा पगडा आजही लोकांच्या मनावर आहे. हजारोंच्या संख्येने आज शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी आले. देशातील लोकांना परिवर्तन हवे आहे. त्याचे पहिले पाऊल साता-यातून टाकले आहे. आमच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम सातारकारांनी केले. सध्या मोदींची शक्ती कमी करणे देशाची गरज आहे असे विधान शरद पवारांनी केले आहे.

सातारा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की विरोधकांकडे सांगण्यासारखे दुसरे काही नाही. शशिकांत शिंदेंना लोकांचा प्रतिसाद मिळतोय हे पाहून त्यांच्यावर आरोप लावले जात आहे. आपले नाणे खणखणीत आहे. लोकांमध्ये शशिकांत शिंदे यांच्याबद्दल आपुलकी आहे. पुरोगामी विचारांना सातारची जनता नेहमीच पाठिंबा देतात. श्रीनिवास पाटलांनाही सातारकरांनी निवडून दिले. गेल्यावेळी आघाडी नव्हती आता आघाडी आहे. एक एक जागा निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी काम करतेय. मोदींची एक एक जागा कमी करणे, मोदींची संसदेतील संख्या कमी करणे, त्यांची शक्ती कमी करणे ही देशाची गरज आहे असे त्यांनी सांगितले.

तसेच देशाची सत्ता मोदींच्या हाती आहे. मागील १० वर्ष त्यांच्याकडे राज्य आहे आणि हिशोब मला मागतात, मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात मी काय काम केले त्याचे उत्तर देऊ शकतो. इंडिया आघाडीच्या उमेदवारांना समाजातील सर्व घटकांना पाठिंबा आहे. मागील निवडणुकीत विरोधकांना एकूण ६ जागा मिळाल्या होत्या. त्यात आम्हाला ४, काँग्रेसला १ तर एमआयएमला १ अशा जागा होत्या. या निवडणुकीत यंदा ६० ते ७० टक्के जागांवर आम्ही विजयी झालो तर आश्चर्य वाटणार नाही. विशेषत: विदर्भात काँग्रेसला यश मिळेल. निवडणुकीतील ईव्हीएम बाबत काहींनी चिंता व्यक्त केली. अनेकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उभे केलेत. त्यामुळे शंकेला जागा आहे असे दिसते असेही शरद पवारांनी म्हटले.

सुनेत्रा पवारांच्या विधानावर स्पष्टीकरण
मी तसे बोललो नव्हतो, मला प्रश्न विचारला होता, अजित पवारांनी भाषण केले होते, त्यात मला निवडून दिले, लेकीला निवडून दिले आता सुनेला निवडून द्या असे म्हणत पुढे त्यांनी एक वाक्य वापरले. त्यावर मी प्रतिक्रिया दिली होती. त्यापेक्षा वेगळे काही सांगितले नाही. या देशात महिला आरक्षणाचा निर्णय राज्यात घेणारा मुख्यमंत्री मी होतो. शासकीय सेवेत विशिष्ट आरक्षण देण्याचा निर्णय मी घेतला. संरक्षण दलात मुलींना सहभागी करून देण्याचा निर्णय मी घेतला. त्यामुळे महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची काळजी मी घेतली. कारण नसताना एखाद्या शब्दावरून वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी फार यशस्वी होणार नाही असे शरद पवारांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR