पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा प्रवक्ते विकास लवांडे यांच्या अटकेनंतर अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. जो गुन्हा विकास लवांडे यांनी कधी केलाच नव्हता, तो गुन्हा त्यांच्या नावावर दाखवून पुणे पोलिसांनी गुरुवारी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध केला होता. मात्र, आज पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नजरचुकीने हा प्रकार घडल्याचे मान्य केले. पोलिसांच्या या अजब कारभारामुळे पुणे पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विकास लवांडे यांच्यावर ८ मे रोजी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी लवांडे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जाला विरोध करताना पोलिसांनी लवांडे यांच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची (गुन्हेगारी पार्श्वभूमी) माहिती न्यायालयासमोर ठेवली. मुळात तो गुन्हा केव्हाच मागे घेतला होता. त्याच्या आधारे लवांडेंवर कारवाई केली. त्यामुळे पोलिसांविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.
















