38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे जिल्ह्यात बंदोबस्ताला सीआयएसएफ, कर्नाटक पोलिस

पुणे जिल्ह्यात बंदोबस्ताला सीआयएसएफ, कर्नाटक पोलिस

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व कर्नाटक पोलिसांच्या सशस्त्र तुकड्या तैनात राहतील. ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाचे मतदान सात मे रोजी होणार आहे. पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच मतदान केंद्रांच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बारामती व शिरूर मतदारसंघातील काही भाग पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारीत येतो.

बंदोबस्तास केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि कर्नाटक पोलिसांच्या आठ तुकड्या तैनात राहतील. मावळ मतदारसंघातील २१८ मतदान केंद्रांच्या ठिकाणी ग्रामीण पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मावळचा काही भाग रायगड पोलिसांच्या अखत्यारीत येतो. बारामती मतदारसंघात एक हजार ८०५ मतदान केंद्रे आहेत. शिरूर मतदारसंघात एक हजार १३७ मतदान केंद्रे आहेत, अशी माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

१८ मतदान केंद्रे संवेदनशील…
जिल्ह्यात १८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यापैकी सहा मतदान केंद्रे बारामती मतदारसंघात आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात आठ संवेदनशील केंद्रे आहेत. त्यापैकी एक केंद्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत आहे. उर्वरित रायगड पोलिसांच्या अखत्यारीत आहेत. मुळशीत दोन आणि इंदापुरात एक मतदान केंद्र संवेदनशील आहे. शिरूर मतदारसंघातील आंबेगाव येथे एक मतदान केंद्र संवेदनशील आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR