31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

छ. संभाजीनगर : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय नेतेमंडळी प्रचारात व्यक्त आहेत तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील निवडणुकांच्या राजकारणापासून दूर आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर ते पुन्हा आरक्षणासाठी लढा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या गाठीभेटी आणि दौरे सुरू असून त्यांनी सध्या बीड जिल्ह्यात लक्ष केंद्रीत केले आहे. आज ते बीड जिल्हा दौ-यावर होते. त्यावेळी मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना बीडमधून तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असून, त्यांच्यावर गॅलक्सी रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.

बीड दौ-यावर असताना अचानक तब्येत बिघडल्याने जरांगे यांना अर्धवट दौरा सोडून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. गतवेळेप्रमाणे त्यांना अशक्तपणा आला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, यापूर्वीही जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही डॉक्टरांनी अशक्तपणामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगितले होते. उपचारानंतर ते पुन्हा आपल्या मराठा आरक्षणाच्या कार्यात सक्रीय झाले होते.

लोकसभेच्या निवडणूक काळात आपल्या गावभेटी दौ-यादरम्यान त्यांनी निवडणूक काळातही थेट भाजपा नेत्यांवर हल्लाबोल केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वी बीडमधील भाजपा उमेदवार पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाल्याची चर्चा माध्यमांत रंगली होती. त्यावेळी मी मनोज जरांगेंवर टीका केली नसल्याचे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR