35.6 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीय विशेषमैदानावरची ‘राजधानी एक्स्प्रेस’

मैदानावरची ‘राजधानी एक्स्प्रेस’

कधीकाळी रावळपिंडीतून धावणा-या रेल्वेच्या नावावर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ अशी ओळख होती. आता भारतात वेगवान गोलंदाजाचा शोध पूर्णत्वास येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. देशाची राजधानी नवी दिल्लीचा भेदक गोलंदाजी करणारा मयंक यादव हा ‘राजधानी एक्स्प्रेस’ नावाने समोर येत आहे. अद्याप तो भारतीय संघात दाखल झालेला नसला तरी १५० किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याची प्रचिती आयपीएलमध्ये आली आहे. त्याने आपल्या गोलंदाजीच्या बळावर स्पर्धक संघाच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला अन् इतिहास घडविला.

कधीकाळी रावळपिंडीतून धावणा-या रेल्वेच्या नावावर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ अशी ओळख होती. आता भारतात वेगवान गोलंदाजाचा शोध पूर्णत्वास येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. देशाची राजधानी नवी दिल्लीचा भेदक गोलंदाजी करणारा मयंक यादव हा ‘राजधानी एक्स्प्रेस’ नावाने समोर येत आहे. अद्याप तो भारतीय संघात दाखल झालेला नसला तरी १५० किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याची प्रचिती आयपीएलमध्ये आली आहे. त्याने आपल्या गोलंदाजीच्या बळावर स्पर्धक संघाच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला अन् इतिहास घडविला. आपल्या पदार्पणाच्या आणि दुस-या सामन्यात जोरदार गोलंदाजी करत त्याने ‘सामनावीर’चा किताब पटकावला. म्हणून भारताला धोकादायक गोलंदाज मिळाला असे म्हणावयास हरकत नाही. वास्तविक कामानिमित्ताने दिल्लीत येऊन राहणा-या कुटुंबाचे आता सोनेरी स्वप्न साकार होऊ लागले आहे. वेस्ट इंडिजचा एकेकाळचा खतरनाक गोलंदाज कर्टली अ‍ॅम्ब्रोसप्रमाणे मयंकने धारदार गोलंदाजी करत फलंदाजाची गाळण उडवावी, असे त्याच्या वडिलांना वाटते.

एखाद्याला स्वत:वर विश्वास असतो आणि एखादे मोठे ध्येय गाठायचे असेल तर तेव्हा तो लहानसहान संधींकडे दुर्लक्ष करतो. ते पारंपरिक साखळी तोडण्यावर विश्वास ठेवतात. त्यांची नजर ज्याप्रमाणे अर्जुनाने पक्ष्याच्या डोळ्यावर केंद्रित केली, त्याचप्रमाणे मयंक यादवने ध्येय निश्चित केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मयंक यादवने आपण शाळेची पाटी नाही तर चेंडू हातात घेणार असल्याचे सांगताच घरात एकच कल्लोळ उडाला. मध्यमवर्गीयांप्रमाणेच त्याच्या कुटुंबात शिकलास तरच पुढे जाशील असे सांगितले गेले होते. ‘पढोगे लिखोगे बनोगे नवाब और खेलोगे कुदोगे बनोगे खराब’ या विचारावर त्यांचेही कुटुंब वाटचाल करत होते. त्यामुळे मयंकच्या कुटुंबाने त्याच्या शाळा सोडण्याच्या निर्णयावर गोंधळ घातला. पण मयंक ठाम होता. स्वत:वर विश्वास होता आणि त्याने ती जोखीम उचलली. तो म्हणाला,

सहा महिन्यांत यशस्वी झालो नाही तर शाळेत जाईन. दुस-यांदा जेव्हा दिल्लीच्या बहुचर्चित सोनेट क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षणाच्या काळात तो सर्व्हिसेस संघात निवडला गेला आणि नोकरीची ऑफर मिळाली तेव्हा ती त्याने स्वीकारण्याऐवजी नाकारली. ते एकप्रकारे मयंकचे अचाट धाडस होते. नोकरी नाकारल्याने आणि संधी गमावल्याने अकॅडमीचे प्रशिक्षक तारक सिन्हा हे नाराज झाले. मात्र मयंकला आपल्या क्षमतेचे चांगलेच आकलन होते आणि स्वत:वर विश्वास होता. दिल्लीच्या संघात खेळण्याचा त्याचा निर्धार होता. हा निर्णय आता सार्थ ठरत असून त्याचा संकल्प प्रत्यक्षात येताना दिसत आहे. भारतीय क्रिकेटचा आगामी काळ हा मयंकच्या नावावर राहण्याची चिन्हे आहेत. फक्त त्याने आपला फिटनेस कायम ठेवणे गरजेचे आहे. तसेच जायबंदी होण्यापासून वाचायला हवे. कारण तंदुरुस्तीवरून तो आयपीएलच्या मागच्या हंगामात लखनौ जाएंटस्च्या संघात निवड होऊनही बाहेर बसला. एक वेगवान गोलंदाज हा संघात प्रेक्षकाप्रमाणे बसला होता आणि ही बाब क्लेषदायक होती. मात्र मयंकच्या संयमाचे कौतुक करायला हवे. कारण लखनौ जाएंटस्साठी मागच्या हंगामात त्याला वीस लाखांची मूळ रक्कम मिळूनही त्याच्यावर मैदानाबाहेर बसण्याची वेळ आली होती.

मयंक हा पश्चिम दिल्ली विभागाचा असून याच विभागात विराट कोहली आहे. एकप्रकारे या विभागाने देशाला आणखी एक हिरा दिला. तो देखील राजधानी एक्स्प्रेसप्रमाणे धावणारा वेगवान गोलंदाज. त्याची वेगवान गोलंदाजी सर्वजण अनुभवत आहेत. विशेष म्हणजे तो अजूनही भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्याच श्रेणीत निवडला गेलेला नाही. आता निवड मंडळीचे सदस्य तो भारतीय संघात कधी प्रवेश करेल, याची वाट पाहत आहेत. भारतासारख्या देशात वेगवान गोलंदाजांचा नेहमीच दुष्काळ राहिलेला आहे. गेल्या चार-पाच दशकांत बोटावर मोजण्याइतपत गोलंदाज सोडले तर भारतीय संघाच्या गोलंदाजांची फळी ही सक्षम दिसून आलेली नाही. अर्थात वेगवान गोलंदाजी ही समोरच्या फलंदाजाला अस्मान दाखवते हे खरे. तो आपल्या वेगाच्या बळावर संघाचा पराभव हा विजयात परावर्तीत करू शकतो.

मयंकने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध १५५ किलोमीटर प्रति तास वेगाने गोलंदाजी करत पहिल्याच सामन्यात २७ धावा देत ३ बळी घेतले आणि ‘प्लेअर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार जिंकला. आपल्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर त्याने शिखर धवनला विजयाचा इतिहास रचत असताना त्याला पराभवाच्या खाईत लोटले. याप्रमाणे सलग दुस-या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळताना त्याच्या गोलंदाजीचा वेग १५६.७ किलोमीटर प्रति तास एवढा पोचला होता. त्याने केवळ चौदा धावा देत तीन बळी घेतले होते. ग्लेन मॅक्सवेल, कॅमरॉन ग्रीनसारख्या दमदार फलंदाजांना त्याने तंबूत पाठविले. मूळ बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील रतहो गावात जन्मलेला मयंक याचा जन्म दिल्लीत झाला. गल्लीबोळात क्रिकेट खेळणा-या मयंकने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत टी-२० च्या विश्वचषकासाठी दावा केला आहे. आगामी काळ हा मयंकचाच आहे आणि तो दीर्घकाळ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळेल, अशी अपेक्षा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR