35.6 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीय विशेषचौसष्ट घरातील भरारी

चौसष्ट घरातील भरारी

बुद्धिबळ खेळात अलीकडील काळात होणारी भारताची वाटचाल लक्षवेधी आहे. भारताचे नामांकित पाच खेळाडू एकाचवेळी टोरँटो येथील प्रतिष्ठित कॅडिडेट्स स्पर्धेत सहभागी झाले असून ही घटना ८४ ग्रँडमास्टर असलेल्या भारतासाठी कदाचित पहिल्यांदाच घडताना दिसत आहे. भारतीय बुद्धिबळाचे प्रतीक असणा-या विश्वनाथन आनंद यांनी तरुण पिढीकडे मशाल सोपविल्यानंतर २०२३ अणि २०२४ च्या प्रारंभी अनेक सकारात्मक बातम्या आल्या. यावरून जागतिक बुद्धिबळ विश्व हे भारताकडे कोणत्या नजरेतून पाहते, हे लक्षात येते. दृढनिश्चयी आणि प्रतिभावंत तरुण खेळाडूंच्या असामान्य कामगिरीमुळे भारताची प्रतिष्ठा ही अद्वितीय पातळीवर पोचली आहे.

अलीकडील काळात बुद्धिबळ खेळात भारताची होणारी वाटचाल लक्षवेधी आहे. भारताचे नामांकित पाच खेळाडू एकाचवेळी टोरँटो येथील प्रतिष्ठित कॅडिडेट्स स्पर्धेत सहभागी झाले असून ही घटना ८४ ग्रँडमास्टर असलेल्या भारतासाठी कदाचित पहिलीच असेल. ग्रँडमास्टर डी. गुकेशने मागच्या आठवड्यात अझरबैजानचा निजात अबासोव्हला कडवी लढत देत पराभूत केले आणि त्यानंतर रशियाच्या इयान नपोनिम्नयश्चिसह संयुक्तपणे आघाडी घेतली. फिडे बुद्धिबळाच्या खेळातील पाचव्या फेरीत विजय नोंदविणारा तो एकमेव भारतीय बनला आहे. अलिकडच्या काळात भारतासाठी एक कॅलेंडर वर्षात एवढ्या मोठ्या घडामोडी क्वचितच घडल्या असतील. भारतीय बुद्धिबळाचे प्रतीक असणा-या विश्वनाथन आनंद यांनी तरुण पिढीकडे मशाल सोपविल्यानंतर २०२३ अणि २०२४ च्या प्रारंभी अनेक सकारात्मक बातम्या आल्या. त्यावरून जागतिक बुद्धिबळ विश्व हे भारताकडे कोणत्या नजरेतून पाहते, हे लक्षात येते. दृढनिश्चयी आणि प्रतिभावंत तरुण खेळाडूंच्या असामान्य कामगिरीमुळे भारताची प्रतिष्ठा ही अद्वितीय पातळीवर पोचली आहे. उच्च दर्जाच्या कॅडिडेट्स स्पर्धेत दोन श्रेणीतील विजेतेपदावर दावेदारी निश्चित करण्यासाठी भारताचे पाच खेळाडू सर्वोत्तम खेळ करतील अशा सन्मानाची कोणी कल्पना केली असेल का? विशेष म्हणजे एकाच स्थानावर आयोजित स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकांत भावंडे सामील झाली आहेत. २०२३ च्या विश्वचषकात चार भारतीय खेळाडू उपउपांत्य फेरीत पोचले होते आणि त्यात एकही रशियन खेळाडू नव्हता. यापैकी एकाने अंतिम फेरीत चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला आव्हान दिले होते. भारतीय माध्यमांकडून बुद्धिबळपटू प्रज्ञानंद याचे नाव सातत्याने घेतले जाते. आनंदनंतर एवढ्या चर्चेत राहणारा तो पहिलाच खेळाडू बनला आहे. तो भारतात उदयोन्मुख खेळाडंूसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

जागतिक क्रमवारीचा विचार केला तर डी. गुकेश या खेळाडूने देखील बुद्धिबळाच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. ३७ वर्षांमध्ये पहिल्या दहा जणांच्या यादीत प्रवेश केल्यानंतर काही काळासाठी त्याने आनंदचे बुद्धिबळातील सर्वोत्तम खेळाडूचे पद काढून घेतले होते. एवढेच नाही तर गुकेशने ‘ग्रँड बुद्धिबळ टूर’मध्ये पदार्पणातच आनंदला दोनदा पराभूत केले होते. २०२३ मध्ये गुकेशने अंतिम फेरीत माजी जागतिक रॅपिड चॅम्पियन नोदिरबेक अब्दुल सत्तोरोव्ह (उझबेकिस्तान)ला पराभूत करत बुद्धिबळातील आर्मागेडन आशिया अणि ओशिनिया ही स्पर्धा जिंकली. ग्रँड स्विस ही बुद्धिबळातील सर्वांत सक्षम आणि खुली स्पर्धा मानली जाते. कोणत्याही भारतीयांकडून खुल्या गटातील ही स्पर्धा जिंकण्याची अपेक्षा करणे चुकीचे मानले जायचे. परंतु विदित गुजराती आणि आर. वैशाली यांनी या स्पर्धेचे भारतीयकरण केले आणि कॅडिडेट्स २०२४ साठी आपली जागा पक्की केली. ही बाब कौतुकास्पद ठरली. २०२३ च्या अखेरपर्यंत गुकेश आणि के. हम्पी हे वेगवेगळा मार्ग निवडत कॅडिडेट्सच्या त्रिकुटात सामील झाले.

महिला गटातील जगातील पहिल्या क्रमांकाची होऊ यिफानने कॅडिडेट्स खेळण्यात फारसा रस दाखविला नाही. त्यामुळे हम्पीने जागतिक क्रमवारीत पुढची रेटिंग मिळवण्यासाठी बिगर पात्रता फेरीतील जागा निश्चित केली. फिडे सर्किट गुणतालिकेत फॅबियानो कारुकानानंतर गुकेश हा नेहमीच दुस-या स्थानावर राहिला आहे. परिणामी टोरँटो येथील कॅडिडेट्स स्पर्धेत प्रज्ञानंद, विदित, गुकेश आणि खुल्या वर्गात वैशाली तसेच हम्पी या महिला वर्गात भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. कॅडिडेट्स स्पर्धेत पाच भारतीय खेळाडूंचा सहभाग असणे ही बाब २०२२ मधील बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पदक जिंकण्याच्या यशापेक्षा कैकपटीने अधिक अलौकिक कामगिरी मानली जात आहे.

सर्वांत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फिडेने नवीन क्रमवारी यादी जाहीर केली आणि त्यात भारताला आणखी एक नवीन स्टार मिळाला. या रॅकिंगमध्ये अर्जुन एरिगसी हा अग्रस्थानी राहणारा भारतीय खेळाडू. २७५६ गुणांच्या रेटिंगसह एरिगॅसी हा जगातील नवव्या स्थानावर आहे तर २०२३ मध्ये तो १७ व्या स्थानी होता. एरिगेसीनंतर विश्वनाथन आनंदचा नंबर लागतो. २१ वर्षीय एरिगेसीने पाचव्या शेनजेन बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत आणि बुंडेसलिगा स्पर्धेत आठ गुण मिळवले आणि यादीत नववे स्थान पटकावले. आनंद हा २७५१ गुणांसह ११ व्या स्थानावर आहे. १८ वर्षीय प्रज्ञानंद, १७ वर्षीय गुकेश आणि विदित संतोष गुजराती हे कॅडिडेट्सचे त्रिकुट आहे आणि ते या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्याचवेळी प्रज्ञानंद २७४६ गुणांसह फिडे क्रमवारीत चौदाव्या स्थानावर आहे. गुकेश २७४३ गुणांसह १६ व्या स्थानी तर २९ वर्षीय विदित २७२७ गुणांसह २५ व्या स्थानी आहे.

माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसन हा अजूनही २८३० गुणांसह शिरोभागी आहे. त्यानंतर दोन अमेरिकी आहेत. फेबियानो कारुआना (२८०३) अणि हिकारू नाकामुरा (२७८९). करुआना आणि नाकामुरा हे दोघेही कॅडिडेट्स जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहेत. त्यानुसार त्यांना जागतिक विजेता डिंग लिरेन यांच्याशी स्पर्धा करावी लागेल. चिनी स्टार खेळाडू २७६२ गुणांसह फिडे रेटिंगमध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्याचवेळी महिला क्रमवारीत कोनेरू हम्पी ही २५४६ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे तर हरिका द्रोणावल्ली ही २५०३ गुणांसह ११ व्या स्थानी आहे. महिला कॅडिडेट्स स्पर्धेत सहभागी होणारी अन्य भारतीय आर. वैशाली ही २४७५ गुणांसह १५ व्या स्थानी आहे.

– विनिता शाह

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR