38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरसमृद्ध इतिहास जाणून घेण्यासाठी मूर्तीशास्त्रामध्ये अधिक संशोधन व्हावे

समृद्ध इतिहास जाणून घेण्यासाठी मूर्तीशास्त्रामध्ये अधिक संशोधन व्हावे

सोलापूर- पुरातन मूर्ती या खूप काही गोष्टी सांगून जातात. त्या अतिशय बोलक्या असतात. महाराष्ट्र आणि आणि देशाचा समृद्ध इतिहास जाणून घेण्यासाठी या मूर्तींचे अभ्यास व संशोधन होणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन डेक्कन कॉलेज, पुण्याचे माजी अध्यक्ष डॉ. जी. बी. देगलूरकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलामधील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र पुरातत्व आणि मूर्तीशास्त्र या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. देगलूरकर यांच्या ऑनलाइन पद्धतीने हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे हे होते. यावेळी नांदेड येथील डॉ. अरविंद सोनटक्के, डॉ. प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून पुरातत्वशास्त्र विभागाच्याप्रमुख डॉ. माया पाटील यांनी पुरातत्वशास्त्र व मूर्तिशास्त्रमधून नवीन संशोधन पुढे यावे, यासाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

डॉ. देगलूरकर म्हणाले की, मूर्तिशास्त्र हा दुर्लक्षित विषय असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मूर्तीच्या खोलवर जाऊन अभ्यास करणे आवश्यक आहे, त्याच वेळेस आपणास जुन्या गोष्टी कळणार आहेत, सोबतच जाज्वल्य इतिहास समोर येणार आहे. मूर्ती पाहणे, ओळखणे, तपशीलवार सांगणे, यापुढे जाऊन ज्यासाठी या मूर्ती निर्माण झाल्या, त्याचेही चिकित्सक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. मूर्तींचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे भावार्थ आहेत. शास्त्रीय दृष्टिकोनातून काही मूर्ती तयार झाल्या आहेत. धार्मिक दृष्ट्या देखील त्या महत्त्वाच्या आहेत. म्हणून या विषयाचे अधिक संशोधन व्हावे, त्यासाठी युवकांनी समोर यावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

डॉ. गौतम कांबळे म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरेला अतिशय महत्व देण्यात आले असून याचाच विचार करून आज मूर्तीशास्त्र या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. अभ्यासक व विद्यार्थ्यांनी बारकाईने यावर अभ्यास करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ. अरविंद सोनटक्के यांनी तथागत गौतम बुद्धापासून ते आता देवदेवतांच्या मूर्तींचे महत्त्व अधोरेखित करताना भूतकाळाचा अभ्यास यामुळे करण्यात येतो, असे सांगितले. यावेळी डॉ. रोहित फळगावकर, डॉ. श्रीकांत गणवीर, डॉ. शांता गीते यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. ज्ञानेश्वरी हजारे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR