36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeलातूरहरंगूळ (खु) येथील सुसंवाद बैठकीस प्रतिसाद

हरंगूळ (खु) येथील सुसंवाद बैठकीस प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी :
लोकसभा निवडणूक २०२४ करीता लातूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. शिवाजी काळगे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने शहर व ग्रामीण भागात सुसंवाद बैठका (काँग्रेस) महाविकास आघाडीकडून घेतल्या जात असून बुधवारी दि. २४ मार्च रोजी सायंकाळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हरंगूळ (खु) येथील ग्रामस्थांची भुजबळ लॉन्स या ठिकाणी सुसंवाद बैठक पार पडली. या बैठकीस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या बैठकीस हरंगूळ(खु) सह रायवाडी, साई,  नागझरी, जेवळी, भोईसमुद्रगा, टाकळी (ब) येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लोकसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी आजून सुरु व्हायची आहे परंतु ज्या वेळी डॉ. शिवाजी काळगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्या वेळेपासूनच मतदारसंघातील सर्व क्षेत्रातील मंडळींकडून या उमेदवारीचे स्वागत तर होत आहे, शिवाय मतदारसंघातील प्रत्येकात उत्साहदेखील वाढला असल्याचे दिसून येत आहे. लातुरमध्ये एक नाही तर दोन आमदार आपले आहेत पण आता आमच्या सोबत एक खासदार देखील आपण डॉ. शिवाजी काळगे यांच्या रूपाने आपण द्यावा. आजचे केंद्रात असलेले सरकार शेतकरी प्रश्नावर उदासीन आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही.  युवकांना नोक-या मिळत नाहीत, बेरोजगारी वाढत आहे. दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत आणि सरकार त्यांचा प्रश्न विचारत न घेता लाठीमार करते. यावरून विद्यमान सरकार सर्वसामान्य नागरिकांना किती दिलासा देतो हे आपण पाहतो आहे.
या सर्व प्रकारच्या गोष्टी मोडीत काढून आपले प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रात आपले सरकार आणि त्यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना आपण भरघोस मतांनी दिल्लीत पाठवावे लागेल असे सांगून पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, हा मांजरा पट्टा काँग्रेस पक्षाच्या मागे आजतागायत खंबीरपणे उभा आहे यापुढे देखील राहावे आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा या लोकसभा निवडणुकीत अधिक लीड आपण महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवारा डॉ. शिवाजी काळगे यांना द्यावी असे आवाहन त्यांनी  केले. यावेळी बोलताना लातूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे म्हणाले की, मला नुकतीच पक्ष नेतृत्वाने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि मागणी विचारात घेता उमेदवारी दिली आहे.
लातुर लोकसभा मतदारसंघाची काँग्रेस खासदाराची खंडित झालेली परंपरा कायम राहावी यासाठी आपण आपल्या मतदानाच्या उर्जेतून दाखवून दयायची आहे आणि यासाठी आपण मला भरघोस मतांनी निवडून देत मला आपली व आपल्या गावाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती त्यांनी यावेळी उपस्थित सर्वाना केली.  प्रास्ताविक करताना धनराज झुंजे पाटील यांनी हरंगूळ (खु) गावातील विकासकामे,आणि काँग्रेस पक्षाचे गावातील संघटन याची माहिती दिली या बैठकीला उपस्थित सर्वांचे आभार अनंत बारबोले यांनी मानले.
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, डॉ.शिवाजी काळगे, सर्जेराव मोरे, सुनील पडिले, श्याम भोसले, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड किरण जाधव, मनोहर झुंजे पाटील, अ‍ॅड.राजेंद्र झुंजे पाटील, धनराज पाटील, धनंजय वैद्य, श्रीराम साळुंके, भारत पाटील, चेअरमन उमाकांत भुजबळ, वसंत उफाडे, परमेश्वर उफाडे यांच्यासह हरंगूळ (खु) सह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR