29.2 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeलातूरपाण्याभावी ८३ हातपंप पडले बंद

पाण्याभावी ८३ हातपंप पडले बंद

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी पातळीतही सातत्याने घट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. जिल्हयातील ३ हजार ४२२ पैकी ८३ हातपंप मार्च अखेरीस पाण्याभावी बंद पडले आहेत. हातपंपाच्या घशाला कोरड पडल्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहण व पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
लातूर जिल्हयात गावांना व वाडयांना हातपंपाच्या पाण्याचा मोठया प्रमाणात आधार आहे. जिल्हयात ३ हजार ४२२ हातपंप असून ८३ हातपंप पाण्या अभावी बंद पडले आहेत. तसेच हातपंप नादूरूस्त असल्याच्या ७० तक्रारी लातूर जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाकडे आल्या होत्या. सदर तक्रारी नंतर ६८ हातपंप दुरूस्त करण्यात आले आसून दोन हातपंप नादूरूस्त आहेत. तर ३ हजार ३३७ हातपंपाचे पाणी नागरीक पिण्यासाठी वापरत आहेत. गेल्यावर्षी जिल्हयात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने यावर्षी  पाणी पातळीतही सातत्याने घट होताना दिसून येत आहे. १०९ जुन्या शिवकालीन विहिरींचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाच्या टिमकडून मार्च मध्ये भूजल पातळीचे निरीक्षण केले असता भूजल पातळीत गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत २.१३ मिटरने घट झाल्याचे निदर्शनास आले होते. या घटत्या भूजल पातळी मुळे हातपंपही पाण्याभावी बंद होताना दिसून येत आहेत.
निलंगा तालुक्यात ३० हातपंप बंद पडले
ग्रामीण भागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपांचा मोठा आधार आहे. जिल्हयातील ३ हजार ४२२ पैकी ८३ हातपंप मार्च अखेरीस पाण्याभावी बंद पडले आहेत. यात सर्वाधिक निलंगा तालुक्यात ३० हातपंपांचा समावेश आहे. अहमदपूर तालुक्यातील २८ हातपंप, औसा तालुक्यातील २५ हात पंपांचा समावेश आहे. सदर तीन तालुक्यात मोठया प्रमाणात हातपंप पाण्याभावी बंद पडले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR